पुणे: औंध येथे राहणारी ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता होती. पुण्यात गोरगरीब आणि गरजूंना अन्न वाटप करणाऱ्या शूरवीर लहुजी तांडव सेनेच्या मदतीने या महिलेला शोधण्यास यश आले. एक महिन्यापासून बेपत्ता असणारी आई मातृदिनाला कुटुंबात सुखरूप आली. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती सेनेचे प्रमुख विनोद शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
संगीता तुपसुंदर असे ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. औंध भागातील झोपडपट्टीत त्या आपल्या परिवारासोबत राहतात. ४ एप्रिलला संगीता या पेन्शन आणण्यासाठी शिवाजीनगरला गेल्या होत्या. खूप वेळ होऊनही त्या घरी आल्या नाहीत. त्यांच्या कुटुंबात दोन मुलांची वेगळी घरे आहेत. संगीता ज्या मुलाकडे राहतात. त्याला आई भावाकडे गेली असल्याचे वाटू लागले. त्याने एक दिवस वाट बघितल्यावर भावाकडे आईबद्दल चौकशी केली. तेव्हा भावाने माझ्याकडे आली नसल्याचे सांगितले. कुटुंबाची शोधमोहिमेस सुरुवात झाली. संगीता यांचे पती पोलीस कर्मचारी होते. त्यामुळे तातडीने पोलिसांनी पाऊले उचलण्यास सुरुवात केली. परंतु आईंचा शोध लागत नव्हता.
कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत शूरवीर लहुजी तांडव सेना गरिबांना अन्नदान करत होती. ते अन्न वाटप करताना फोटो काढून सोशल मीडियावर टाकत होते. या संस्थेचे व्हाट्स अँपवर जवळपास ५२ ग्रुप आहेत. तर एका ग्रुपमध्ये २०० ते २५० च्या आसपास सदस्य आहेत. शिवाजीनगर स्टेशनवर अन्न वाटप करताना त्यांनी संगीता यांच्याबरोबर काढलेला फोटो आपल्या सर्व ग्रुपमध्ये व्हायरल केला. तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत हा फोटो पोहोचला. तुपसुंदर यांनी संस्थेशी संपर्क साधून आईला घरी आणले.
डिसेंबर महिन्यात झाले मुलीचे निधन
संगीता यांच्या मुलीचे डिसेंबर २०२० मध्ये निधन झाले होते. मुलीच्या निधनाने त्या नैराश्यात होत्या. म्हणूनच त्या सोडून गेल्या असतील. असे कुटुंबीयांनी सांगितले आहे.