लक्ष्मण मोरे-
पुणे : देशभरामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात असले तरीही व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड कमी पडू लागले आहेत. या काळात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रिकल्चरने ''मिशन वायू'' हाती घेतले आहे. २५ एप्रिल रोजी सुरू झालेल्या या मिशनमधून आतापर्यंत तब्बल ३० कोटींचे साहित्य जमा करण्यात यश आले आहे. तब्बल ७०० पेक्षा अधिक व्हेंटिलेटर आणि ४ हजारांपेक्षा अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देशभरात पुरविले आहेत.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सकडून कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच ''पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स''च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम केले. पीपीसीआरच्या माध्यमातून वैद्यकीय क्षमता वाढविण्यावर भर दिला आहे. गेल्या महिन्याभरापासून देशभरात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे एमसीसीआयएने ''मिशन वायू'' अभियान हाती घेतले आहे.
या अभियानांतर्गत देशभरातील विविध उद्योजकांकडून वैद्यकीय साहित्याची मदत मिळविण्यात आली. तसेच ''गिव्ह इंडिया''च्या माध्यमातून आर्थिक मदतही उभी करण्यात आली. महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात तसेच देशभरात ही मदत पोचविण्यात आली आहे.
-----
या अभियानांतर्गत पाहिल्या टप्प्यात सिंगापूरहून तब्बल २५० बायपॅप व्हेंटिलेटर, ४ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत मिळविण्यात आली. सिंगापूर सरकारशी याबाबत बोलणी करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या लाटेतच सिंगापूर सरकारने वैद्यकीय साहित्य ''रिझर्व्ह'' ठेवलेले होते. यातील साहित्य टेमासेक या एनजीओच्या मदतीने मिळविणे शक्य झाले.
----
दुसऱ्या टप्प्यात ३५० व्हेंटिलेटर मागविण्यात आले असून टेमासेक फाऊंडेशनने त्याचा निम्मा खर्च उचलला आहे.
तर, निम्मा खर्च पीपीसीआर करणार आहे. तिसऱ्या टप्प्यात आणखी ३५० व्हेंटिलेटर येणार आहेत.
----
या अभियानांतर्गत क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने ३० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले आहेत. तर, टाटा कंपनीकडून ४० व्हेंटिलेटर दिले आहेत. तर, फोर्स मोटर्सकडूनही मदत मिळाली आहे.
----
पहिल्या टप्प्यात आलेले साहित्य महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आले आहे. तर, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील साहित्य देशभरात वितरित करण्यात आले आहे.
----
मिशन वायू हे अभियान अवघ्या एक आठवड्यात उभे राहिले आहे. एक आठवड्यात ३० कोटींच्या वैद्यकीय साहित्याची मदत उभी राहिली आहे. ''गिव्ह इंडिया''च्या माध्यमातून सव्वा कोटी आर्थिक निधी जमा झाला आहे. देश-विदेशातून लोक मदत करीत असून पुण्यासह देशभरातील विविध कंपन्यांनी आणि कॉर्पोरेट क्षेत्रामधून ही मदत उभी राहिली आहे. याचा फायदा देशभरातील हजारो रुग्णांना झाला आहे.
- सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए तथा प्रमुख पीपीसीआर
----
ठळक मुद्दे
१. देशभरात साहित्य पोचविण्यासाठी अमेझॉन इंडियाची मदत
२. केंद्र शासन व राज्य शासनाकडून विशेष सहकार्य
३. केंद्र शासनाने माफ केले कोट्यवधींचे आयात शुल्क