पुणे: राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा टक्का अधिक वाढविण्यासाठी व शंभर टक्के पात्र लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात "मिशन कवच कुंडल " अभियान हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात सर्व तालुके, नगरपालिकांमध्ये जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी विशेष 'सप्तपदी' निश्चित केली आहे.
मिशन कवच कुंडलमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये लसीकरण न झालेल्या सर्व लाभार्थ्यांना पहिली मात्रा व देय असलेल्या लाभार्थ्यांना दुसरी मात्रा लवकरात लवकर देण्यात येणार आहे. या सप्तपदीमध्ये सलग ७५ तास कोविड लसीकरण, कोविड लसीकरण आपल्या दारी, शंभर टक्के पहिला व सर्व शिल्लक देय दुसरा डोस, कोविड लसीकरणाने पूर्ण संरक्षित गाव, विक्रमी उद्दिष्ट ५ लक्ष लसीकरण, महिलांचे शंभर टक्के लसीकरण, खाजगी संस्थांचा सक्रीय सहभाग असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ८९८ खाजगी व १ हजार १६ शासकीय कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून आहेत. एकंदरीत प्रशिक्षित मनुष्यबळाचा व खाजगी संस्थांचा सहभाग लक्षात घेता एकाच दिवसात ५ लक्ष लाभार्थ्यांचे कोविड लसीकरणाचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील कोविड लसीकरणाचे अवलोकन केले असता, ८१ टक्के नागरिकांचे पहिला डोस व ४५ टक्के नागरिकांचे दुसरा डोस पुर्ण झाल्याचे निदर्शनास येत आहे. मिशन कवच कुंडल या अभियानाअंतर्गत उर्वरित नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन मोहिमेच्या यशस्वीतेसाठी कार्यक्षेत्रातील खाजगी स्वयंसेवी संस्था, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक, नर्सिंग कॉलेजेस/शाळा, महाविद्यालये इत्यादींचा सहभाग घेण्यात येणार आहे.
सलग 75 तास लसीकरण -मिशन कवच कुंडल मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवार (दि. ११) रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते गुरुवार १४ ऑक्टोबर, दुपारी ११ वाजेपर्यंत सलग ७५ तास कोविड लसीकरण राबविण्यात येणार आहे. यासाठी अत्यंत सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मिशन कवच कुंडल अभियान पुरस्कार- मिशन कवच कुंडल योजनेमध्ये कोविड लसीकरणाचे सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या प्रथम ३ प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, नगरपालिका, ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालये, तालुके, ग्रामपंचायतींना यथोचित पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.