सोशल मीडियावरही ‘मिशन राजकारण’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:33 PM2019-11-27T12:33:22+5:302019-11-27T12:33:35+5:30

तब्बल एक महिना रंगलेल्या सत्तासंघर्षाच्या महानाट्यात मंगळवारी वेगवान घडामोडी घडल्या.,..

'Mission politics' on social media | सोशल मीडियावरही ‘मिशन राजकारण’

सोशल मीडियावरही ‘मिशन राजकारण’

Next

पुणे : मोहीम फत्ते!, ‘पवार’फुल गेम, ‘८० व्या वर्षी ८० तासांत सरकार पाडलं’, ‘पवारच किंगमेकर’, ‘मी पुन्हा चाललो’, ‘मी पुन्हा येईन... वर्षावरील सामान घ्यायला’, ‘पडण’वीस सरकार... अशा विविध पोस्टचा सोशल मीडियावर मंगळवारी अक्षरश: पाऊस पडला. तब्बल एक महिना रंगलेल्या सत्तासंघर्षाच्या महानाट्यात मंगळवारी वेगवान घडामोडी घडल्या. अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची केलेली घोषणा, महाविकास आघाडीची स्थापना, उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा या सर्व राजकीय घटनांचे पडसाद सोशल मीडियावर उमटले.
तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार, हे जवळपास निश्चित झाले असतानाच महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मध्यरात्री हटवण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान २४ तासांमध्ये बहुमत सिद्ध करण्याचा दिलेला निकाल आणि अजित पवारांची माघार यामुळे आणखीनच रंगत वाढली. फडणवीस सरकार ७८ तासांत कोसळले आणि याबाबत नेटिझन्सनी राजकारण झोडपून काढले. 
‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’.... अजितदादा म्हणतात, मी नाही येत... घरचे सोडत नाहीत’...सर्वात जास्त कार्यकाळ आणि सर्वात कमी कार्यकाळ-दोन्ही विक्रम देवेंद्र फडणवीसांच्या नावावर जमा... वस्ताद एक डाव शिकवतो, पण एक डाव कायम राखून ठेवतो... राज्य झोपेत असताना शपथविधी, पुणेकर झोपेत असताना राजीनामा... क्यूं हिला डाला ना... फडणवीसांनी राजीनामा रात्री दिला असता तरी चाललं असतं, मी जागाच असतो-इति राज्यपाल’ अशा अनेक प्रतिक्रिया फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा विविध माध्यमांमधून व्यक्त झाल्या. विविधांगी प्रतिक्रियांमधून नेटिझन्सच्या हुशारीची जणू चुणूकच पाहायला मिळाली. ‘मोठा गेम...जो माध्यमांनाही समजला नाही’...‘उद्यापासून ‘सूत्रे’ बेरोजगार होणार’...‘काका-चुलत्यांनी केला गेम’ अशी मार्मिक टिपण्णीही यानिमित्ताने नेटिझन्सकडून केली.
......
सोशल मीडियामुळे सर्वांनाच अभिव्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. सामाजिक, राजकीय अशा सर्वच घटनांवर सोशल मीडियावर वेगाने प्रतिक्रिया उमटत असतात. महाराष्ट्रातील राजकीय नाट्यानंतरही हेच चित्र पाहायला मिळाले. यानिमित्ताने अनेक नागरिकशास्त्राची माहिती देणाºया पोस्ट, घटनेतील बारकावेही जाणून घेता आले, अशी प्रतिक्रियाही सोशल मीडियावरच व्यक्त झाली. 

Web Title: 'Mission politics' on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.