धनकवडी (पुणे) : एमआयटी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.१०) रात्री ९ च्या सुमारास उघडकीस आली. विनीत अरविंद मारू (वय १९, रा. ठाणे ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पोलिस नियंत्रण कक्षाला एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खबर मिळाली. खबर मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समीर कदम आणि मार्शल घटनास्थळी दाखल झाले. विनीतने चादरीच्या साहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेतला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. विनीत हा कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. पोलिसांना त्याच्याजवळ सुसाईड नोट देखील सापडली नाही.