कोरोनामुळे यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. यावर्षी स्पर्धेत देशभरातून २०० संघांनी भाग घेतला. त्यात १५० संघांनी ‘एम बाहा’ तसेच ५० संघांनी ‘ई बाहा’ प्रकारामध्ये नोंदणी केली होती. एमआयटीच्या पिरान्हा रेसिंग संघांनी ओव्हरऑल डायनामिक्स, ऑल टेरेन परफॉर्मन्स, ग्रेडबिलिट, सस्पेन्शन आणि ट्रॅक्शनमध्ये प्रथम, एक्सलरेशन आणि ओव्हरऑल स्टॅटीक्समध्ये दुसरा, तसेच कॉस्ट प्रेझेंटेशनमध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे.
या स्पर्धेमध्ये संघाला एक आसनी सर्व भूप्रदेशीय चारचाकी वाहन बनविण्याचे आव्हान दिले होते. त्यामध्ये विविध स्तरावर आणि अभियांत्रिकी गुणांवर चाचण्या घेतल्या जातात. नोव्हेंबर २०२० मध्ये प्राथमिक फेरीत प्रश्नमंजूषा आणि सादरीकरण घेण्यात आले. पहिल्यांदाच ही स्पर्धा संगणक आधारित प्रणालीवर घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी या प्रणालीचा वापर करून संपूर्ण वाहन बनवून त्याचे सादरीकरण केले.
माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रकाश जोशी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर स्पर्धांसाठी विद्यापीठ नेहमीच मुलांना प्रोत्साहन आणि सुविधा देते.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.