पुणे : मिक्सोपॅथी ही विश्वासार्ह नसून ती मला स्वत:लाही मान्य नाही. त्यामुळे मिक्सोपॅथी प्रमोट करता येणार नाही. मात्र,सध्या वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित संशोधन सुरू असून उपचार पद्धतीमध्ये ‘सायंटिफिक कल्चर’ वाढविण्याबरोबरच ‘सायंटिफिक इकोसिस्टीम’ची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे पुढील काळात वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित औषधे उपलब्ध होतील, असे केंद्रीय आयर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषदेचे नवनियुक्त नॅशनल रीसर्च प्रोफेसर डॉ. भूषण पटवर्धन यांनी गुरुवारी सांगितले.
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आयर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषदेच्या नॅशनल रीसर्च प्रोफेसरपदी शुक्रवारी डॉ. भूषण पटवर्धन यांची नियुक्ती झाली.त्यांनी बुधवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘आयुष संस्थांच्या संघ’ स्थापनेच्या कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी संवाद साधला. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (आयएमए) सध्या ‘मिक्सोपॅथी’ला विरोध केला जात असून देशभर साखळी उपोषण सुरू आहे.याबाबत पटवर्धन यांनी आपली स्पष्ट भूमिका पत्रकारांशी बोलताना मांडली.
डॉ. पटवर्धन म्हणाले,आयुषमध्ये खूप कमी संशोधन होत असल्याची टीका केली जाते. आयुषच्या उपचार पद्धतीमध्ये विज्ञानाचा वापर करून संशोधन कसे करावे, त्याचे नियम कसे पाळावे, रुग्णांवर झालेल्या उपचारांचा योग्य नोंदी ठेवणे अशा बाबी आवश्यक ठरतात. तसेच आयुष क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ञ, सल्लागार, वैद्य या सर्वांना संशोधनाची दिशा देणे गरजेचे आहे. या सर्वांमधील संशोधनाची क्षमता वाढविण्यासाठी; तसेच आयुषमध्ये उत्तम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने व्यासपीठ निर्माण करण्याची आवश्यकता होती.
पटवर्धन म्हणाले, पुणे विद्यापीठात पूर्वी सुरू असणारा ‘वैद्य सायंटीस्ट प्रोग्रॅम’ आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर राबविणार आहे. वैद्यसुद्धा शास्त्रज्ञ असावेत. शास्त्रज्ञालासुद्धा आपल्या पारंपरिक वैद्यकीय उपचार पद्धतींची जाणीव असणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन्हींमध्ये माहितीचे आदानप्रदान होऊन संशोधन होण्याची गरज आहे. त्यासाठी हा संघ काम करणार आहे.