बारामतीच्या डॉक्टरांच्या संशोधनाची
आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
बारामतीच्या डॉक्टरांच्या संशोधनाची
आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
बारामती :बारामतीच्या डॉक्टरांनी हळद आणि काळी मिरी यांच्या मिश्रणातून बनवलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक औषधाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या औषधाच्या वापराने कोरोनाबाधित रुग्णांवर देखील उपचार होऊ शकतात. तसेच कोरोनामुळे शरीरावर होणारे दुरगामी परिणाम देखील टाळता येऊ शकतात.
हळदीमध्ये आढळणारा ' करक्युमीन ' हा पोषक घटक व काळी मिरी यांच्या मिश्रणातून हे औषध बनविण्यात आले आहे. बारामतीच्या डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहुल मस्तूद व त्यांच्या सहकाऱ्यानी यासंदर्भात केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी यामध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. याबाबत डॉ. कीर्ती पवार म्हणाल्या की, बारामती येथील सार्वजनिक रुग्णालयात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांची मान्यता मिळाल्यानंतर करक्युमीन या औषधाची क्लिनीकल ट्रायल १४० रुग्णांवर घेण्यात आली. यात सौम्य लक्षणे, मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा समप्रमाणात सहभाग होता. रुग्णालयात दाखल होताना रुग्णांची शरीरात असलेली ऑक्सिजनची पातळी यावरून करोनाबाधित रुग्णांची सौम्य, मध्यम व तीव्र लक्षणांमध्ये विभागणी करण्यात आली. अशा रुग्णांच्या एका समूहाला कोव्हीड टास्क फोर्सने निर्देशित केलेली ओषधे देण्यात आली, तर दुसऱ्या समूहाला कोव्हीड टास्क फोर्सने निर्देशित औषधांसोबत करक्युमीन ५२५ एमजी व बायोपेरीन अडीच एमजी (म्हणजे हळद व काळी मिरी याचे योग्य मिश्रण असलेले ) हे औषध दिवसातून दोन वेळा देण्यात आले. या निरीक्षणांमधून खालील निष्कर्ष मिळाले.
- करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रणयुक्त गोळ्या दिलेल्या रुग्णांमध्ये
- ताप, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे कमी होऊन रुग्ण लवकर बरे झाले.
- हे औषध घेणाऱ्या रुग्णांमधील गंभीरतेचे प्रमाण खूप कमी झाले.
- हे औषध न दिलेल्या रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी ७ ते २७ दिवस होता तर करक्युमीन घेतलेल्या रुग्णांचा ५ ते १० दिवस होता.
- करक्युमीन घेतलेल्या रुग्णांना आॅक्सिजन लावण्याची गरज कमी भासली.
- तसेच कृत्रिम श्वसनाचे मशीन लावण्याची गरजही कमी झाली.
- रुग्णालयात दाखल होताना मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना रेमडेसिविरची गरज कमी लागली.
- मध्यम व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांमधील मृत्यूदर कमी झाला.
- रक्त पातळ करणाऱ्या हेपॅरिन या इंजेक्शन बरोबर करक्युमीन दिल्यास फायदा होतो व कोणतेही दुष्परिणाम होत नाही हे सिध्द झाले.
- या हळदीच्या गोळीमुळे रक्त न गोठता प्रवाही राहण्यास मदत झाल्यामुळे कोव्हीडमुळे फुफ्फुसावर होणारे दुष्परिणाम, ह्रदयाच्या, फुफ्फुसाच्या व शरीरातील रक्तवाहिन्यांमध्यें होणाऱ्या गुठळ्या, असे घातक दुष्परिणाम टाळण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली.
----------------------------------------------
कोरोना होऊन गेल्यावरही पुढील ३ महिने या गोळीचा मर्यादित स्वरूपात वापर करून कोरोनामुळे होणारे दुरगामी परिणाम टाळण्यासाठी मदत होऊ शकते याचा शास्त्रीय पुरावा या संशोधनाद्वारे मांडण्यात आला. डॉ. किर्ती पवार, डॉ. राहुल मस्तूद, डॉ सतीश पवार, सम्राज्ञी पवार, डॉ. रमेश भोईटे , डॉ. राहुल भोईटे, डॉ. मिनल कुलकर्णी व संख्याशास्त्रज्ञ आदिती देशपांडे यांच्या चमूने केलेले हे संशोधन औषधशास्त्रातील विख्यात आंतरराष्ट्रीय जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी यामध्ये प्रसिद्ध झाले आहे. यामुळे भारतातीलच नाही जगभरातील कोरोना रुग्णांमधील उपचारासाठी मदत होणार आहे. या संशोधनामुळे शासकीय व वैद्यकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत मिळेल. करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रण असलेली गोळी यू.एस.एफ.डी.ए मान्यताप्राप्त आहे व ती कोणत्याही औषधाच्या दुकानात उपलब्ध आहे व कोव्हीड होऊ नये म्हणून रोज एक गोळी घेतल्यास त्याचा प्रतिबंधात्मक उपयोग होऊ शकतो.
————————————————
फोटो ओळी : डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहुल मस्तूद
२३०४२०२१-बारामती-१०
————————————————