Atul Benke ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वारे उलट्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असतानाच आता आणखी एक आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.
शरद पवार हे आज उत्तर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके हेदेखील तिथे दाखल झाले आणि त्यांनी पवार यांची भेट घेत चर्चा केली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार बेनके यांनी सहा महिने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र नंतरच्या काळात त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात अजित पवारांना मोठा धक्का बसला आणि शरद पवारांच्या पक्षाचे अमोल कोल्हे पुन्हा खासदार झाले. बेनके यांच्या जुन्नर विधानसभा मतदारसंघातूनही कोल्हे यांनी मोठं मताधिक्य घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर आता अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या आश्रयाला जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, अतुल बेनके यांनी पक्षांतर करत आगामी काळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यास त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
अजित पवारांसाठी धोक्याची घंटा
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लढवलेल्या १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला, तर अजित पवारांच्या पक्षाला अवघी एक जागा जिंकता आली. त्यामुळे अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांची धाकधूक वाढली असून यातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षाकडून केला जात आहे. अशातच आता भेटीगाठींचा जोर वाढल्याने आगामी काळात ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान अजित पवार यांच्यासमोर असणार आहे.