नारायणगाव : आम्ही पवार कुटुंबीयांसोबत आहोत. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आमचे दैवत आहेत; तर अजित पवार हे आमचे नेते आहेत. आपण कोणाहीसोबत न जाता आपली भूमिका तटस्थ असून, येत्या २०२४ मधील विधानसभा लढविणार नसल्याचे आमदार अतुल बेनके यांनी जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.
नारायणगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अतुल बेनके यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याचे जाहीर केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे, बाळासाहेब खिलारी, विकास दरेकर, विनायक तांबे, अमित बेनके, भाऊ देवाडे, अशोक घोडके, फिरोज पठाण, गणेश वाजगे, अजिक्य घोलप, अतुल भांबेरे, रोहिदास केदारी, शेखर शेटे, उज्ज्वला शेवाळे, ज्योती संते, वैष्णवी चतुर, अक्षदा मांडे, स्वरूप विधाटे, सीमा रघतवान आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार अतुल बेनके पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर प्रकृती अस्वस्थतेमुळे चार-पाच दिवस आपण आपली भूमिका जाहीर केली नाही; मात्र तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून, पक्षाची बैठक घेऊन आपण हा निर्णय घेतला आहे. माजी आमदार वल्लभ बेनके हे गेली ३५ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत आहेत. शरद पवार यांनी त्यांना सहा वेळा जुन्नर विधानसभेची उमेदवारी दिली आणि चार वेळा ते आमदार राहिले आहेत. वल्लभ बेनके यांना दोन वेळा मंत्रिपदाची संधी आली होती; परंतु त्यावेळी त्यांना थांबविण्यात आल्याने मंत्रिपदाची संधी गेली. तरीही बेनके यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही.
अजित पवार यांनी जुन्नर तालुक्याला भरीव मदत केली आहे. वडील वल्लभ बेनके यांची तब्येत ठीक नसताना दिलीप वळसे-पाटील हे वडिलांसारखे मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे अजित पवार व दिलीप वळसे हे दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता मला निर्णय घेणे अवघड जात आहे. माझ्या आमदारकीला एक वर्ष शिल्लक आहे. तेवढ्या काळात मी पूर्ण ताकद लावून जुन्नर तालुक्यातील विकासकामे करणार असल्याचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.