(सुधारित बातमी)
खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा : चौघांना ३० मेपर्यंत काेठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनेसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यासह चार जणांना रत्नागिरी येथून अटक करण्यात आली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ याच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. निगडी पोलिसांनी ही कारवाई केली.
सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार रमेश सलादल्लू, सतीश दशरथ लांडगे, रोहित दुर्गेश पंधरी, अशी रत्नागिरी येथून अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी अतिश महादेव जगताप, रोहित ऊर्फ सोन्या गोरख भोसले, सुलतान इम्तियाज कुरेशी, ऋतिक लक्ष्मण वाघमारे (वय २०), शुभम आळसंदे, मोहित ऊर्फ एमडी संजय निवारण, अनमोल गुंजेकर, साजिद मेहबूब शेख, रोहित कुसाळकर यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. काळभोरनगर, चिंचवड येथे १२ मे रोजी ही घटना घडली होती. याच्या परस्परविरोधी निगडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. बेकायदा जमाव जमवून मारहाण करून खुनाचा प्रयत्न करणे; तसेच अपहरण करून खुनाचा प्रयत्न करणे, असे दोन वेगवेगळे गुन्हे निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले.
पहिली घटना एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रा. लि. यांच्या आकुर्डी येथील कार्यालय येथे ११ मे २०२१ रोजी घडली. याप्रकरणी स्वाती सचिन कदम (वय ३९, रा. गंगानगर, फुरसुंगी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात १२ मे २०२१ रोजी फिर्याद दिली. दुसऱ्या घटनेत तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी प्राधिकरण) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात १३ मे २०२१ रोजी फिर्याद दिली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये सिद्धार्थ अण्णा बनसोडे आणि इतर काही आरोपी फरार होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. मात्र, दोन आठवड्यांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते.
आरोपी हे उरण (जि. रायगड) येथे असल्याचे तांत्रिक विश्लेषणातून समोर आले. पोलीस तेथे पोहचले असता आरोपींनी उरण येथून पळ काढला. वाकडी, न्यू पनवेल येथे फार्महाऊसवर गेल्याचा आरोपींनी बनाव केला. फार्महाऊसवर पोलीस पोहोचले असता गुंगारा देण्यासाठी आरोपींनी बनाव केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी रत्नागिरीकडे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पाठलाग करत माग काढत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे येथील लक्ष्मी नगरमधील श्रमसाफल्य बंगल्यात आरोपी लपून बसले आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी सिद्धार्थ बनसोडे, सावंतकुमार, सतीश लांडगे, रोहित पंधरी यांना पकडून गुरुवारी (दि. २७) अटक केली.