पुणे : भाजपचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी महापालिका आयुक्ताकडे आपली व्यथा मांडत महापालिकेच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मतदारसंघातील पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या भागामध्ये विकासकामे होत असतांना महापालिका प्रशासनाच्या कुठल्याही खात्याकडून लोकप्रतिनिधी म्हणून मला संपर्क होत नाही. विकासकामांची माहिती देखील उपलब्ध करून दिली जात नाही असेही तापकीर यांनी सांगितले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या नियोजनाबाबत तसेच विविध विषयांच्या अनुषंगाने केलेल्या पत्रव्यवहारात माहिती उपलब्ध करून देण्यात होत असलेला विलंब आणि महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने भीमराव तापकीर यांनी पत्रादारे नाराजी व्यक्त केली आहे. मतदारसंघातील विविध गृहरचना संस्था, इमारती, वस्ती भागातील नागरिक सतत पाठपुरावा करीत असतांना त्यांना त्यांच्या समस्यांशी निगडीत प्रश्नांवर चर्चा करतांना प्रशासनाकडून वेळेत माहिती उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या भागामध्ये किती निधी मंजूर करण्यात आला व कोणकोणत्या कामांसाठी याबाबत सविस्तर माहिती तत्काळ उपलब्ध करून दयावी. अशी मागणी आमदार तापकीर यांनी आयुक्तांकडे केली आहे.