लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सहकार कायद्यानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकांना सलग तीन वेळा अनुपस्थित राहिल्याबद्दल विधान परिषद आमदार आणि संचालक अनिल भोसले यांचे संचालकत्व संपुष्टात येऊ शकते. या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा बँकेने पुणे विभागाच्या सहकार सहनिबंधकांकडे पाठवला आहे.
राज्याच्या सहकार कायद्यातील सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत संचालक मंडळाच्या बैठकांना कोणतीही परवानगी न घेता अथवा रजेचा अर्ज न देता सलग तीन वेळा अनुपस्थित राहिल्यास संबंधित संचालकाचे संचालकत्व संपुष्टात आणण्याची तरतूद आहे. आमदार अनिल भोसले हे सहकारी बँका पतसंस्था या प्रवर्गातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक आहेत.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अनिल भोसले सध्या तुरुंगात आहेत. सलग तीन बैठकांसाठी त्यांची अनुपस्थिती असून त्यांनी रजेचा अर्ज देखील पाठवलेला नव्हता. सहकार सहनिबंधकाकडून या प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित संचालक आणि भोसले यांना नोटीस पाठवून त्यावर सुनावणी घेतली जाईल, त्यानंतर संचालक पदावरून त्यांना हटवण्याचा निर्णय घेतला जाईल.