नारायणगाव : ‘जुन्नर तालुक्यातील ई-टेंडर मला भेटल्याशिवाय भरायचे नाही, जर टेंडर भरले, तर केलेल्या कामांची चौकशी लावली जाईल,’ अशी दमबाजी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी एका ठेकेदाराला केल्याने सोनवणे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत़ ठेकेदाराने सोनवणे यांच्याविरुद्घ नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, ठाणे अंमलदाराने तक्रार घेण्यास नकार दिला व साहेबांशी चर्चा करा, असा सल्लाही दिला. तलाठी दीपक हरण यांना मारहाण केल्याचे प्रकरण शांत होत नाही तोच सोनवणे यांनी वैशाखखेडे पिंपळवंडी या त्यांच्याच गावातील ठेकेदार नवनाथ श्यामराव लष्करे यांना बुधवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या भ्रमणध्वनीवरून कॉल करून, ‘जुन्नर तालुक्यातील कामांसाठी, मला विचारल्याशिवाय निविदा भरायच्या नाहीत़ आधी मला भेटायचे व मगच निविदा भरायच्या, जर न विचारता व न भेटता निविदा भरल्यास तुम्ही केलेल्या कामांची चौकशी लावीन, तुम्ही तीन वर्षांत जी कामे केलीत त्याची सर्व माहिती मी तयार करून ठेवली आहे,़ यापूर्वी अशाच दोन पुढाऱ्यांची चौकशी लावली होती, ते पळून गेले. तशीच तुमच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.’ असा दम दिला़ लष्करे ठेकेदारी व्यवसाय करतात. गेल्या दोन वर्षांपासून ई-निविदामार्फत कामांचे टेंडर भरले जाते़ त्यानुसार लष्करे यांनी नुकतेच ई-टेंडर भरणार असल्याचे काही ठेकेदारांना सांगितल्यानंतर, सोनवणे यांनी त्यांना दमबाजी केली. या दमबाजीनंतर लष्करे नारायणगाव पोलीस ठाण्यात सोनवणे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता, ठाणे अंमलदाराने ही तक्रार घेण्यास नकार दिला़ थोरातसाहेबांना भेटा, असे सांगितले़ लष्करे यांनी दिलेल्या निवेदनात, सोनवणे यांनी दमबाजी केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या दमबाजीच्या भाषेमुळे माझ्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मला काही झाल्यास सोनवणे जबाबदार राहतील, असे ते म्हणाले. याबाबत नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात म्हणाले, लष्करे यांनी ऐकवलेल्या संभाषण रेकॉर्डिंग क्लिपमध्ये कुठल्याही प्रकारे दमबाजी केल्याचे जाणवत नाही़ त्यामुळे त्यांची तक्रार घेण्यात आलेली नाही़ लष्करे निकृष्ट काम करत असल्याने त्यांना टेंडर देण्यास विरोध केला आहे़ सोनवणे यांनी आपल्याला विचारल्याशिवाय ई-टेंडर भरू नये, असे लष्करे यांना संभाषणात म्हटले आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली.
आमदारांचा ठेकेदारास दम
By admin | Published: February 21, 2016 3:08 AM