Pune Accident : पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत मयूर मोहिते यांच्या फॉर्च्युनरने विरुद्ध दिशेने येत दुचाकीला धडक दिल्याने ओम उर्फ बंटी सुनील भालेराव हा तरुण ठार झाला. अपघातानंतर मयूर मोहिते मदत न करता पळ काढण्याच्या तयारीत होता. मात्र ग्रामस्थांनी त्याला रोखले. अपघातानंतर मयूर मोहिते गाडीतच बसून होते. स्थानिक तरुणांनी बडबड केल्यानंतर ते खाली उतरले, अशी माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर आता अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यपानही केलेलं नव्हतं, असा दावा दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे.
"माझा पुतण्या नारायणगाव मार्गे कळंबवरुन खेडकडे येत होता. अपघात कसा झाला? याबाबत कुणालाच काहीच कल्पना नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस सगळ्या प्रकारची चौकशी करत आहेत. झालेली गोष्ट ही १०० टक्के चुकीची आहे. मी मृत तरुणाच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून वातावरण शांत झालं की मी स्वतः त्यांची भेट घेणार आहे. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही आणि करणार नाही," असे दिलीप मोहिते पाटील यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितले.
"माझा पुतण्या आयुष्यात कधीही दारू प्यायलेला नाही आणि तो दारू पित नाही. तो इंजिनिअर आहे. तो उद्योजकदेखील आहे. त्यामुळे असले प्रकार त्यानं त्याच्या आयुष्यात कधीच केलेले नाहीत. अपघात झाला त्या ठिकाणी कुणीच नव्हतं. त्यामुळे प्रथमदर्शनी चूक नेमकी कुणाची? हे अजून पोलिसांनी मला सांगितलेलं नाही. पोलीस ज्यावेळी माहिती देतील, त्यावेळी मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. माझा पुतण्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे.पोलिसांनी माझ्या पुतण्याचे वैद्यकीय तपासणीसाठी सॅम्पल्स घेतलेले आहेत. अपघातग्रस्त तरुणाला माझ्या पुतण्यानं अॅम्बुलन्समध्ये टाकलं. त्यामुळे इतर आरोपांत मला तथ्य वाटत नाही," असेही दिलीप मोहिते पाटील म्हणाले.
कसा झाला अपघात?
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते हा त्याच्या ताब्यातील फॉर्च्युनर गाडी घेऊन कळंब बाजूकडून मंचरकडे भरधाव वेगाने चालला होता. त्याचवेळी ओम उर्फ बंटी सुनील भालेराव हा मोटरसायकलवरून कळंब गावाकडे चालला होता. जुना पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत पिकअप गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोहिते यांच्या फॉर्च्युनर गाडीची ओमच्या दुचकीला जोरदार धडक बसली. दुचाकी चालक ओम सुनील भालेराव हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला होता.