पुणे : राजकीय प्रतिस्पर्धी आणि त्यांच्या कुरघोड्या देशाला नवीन नाही. पुण्यातील एका कार्यक्रमात मात्र पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांची जोरदारफटकेबाजी बघायला मिळाली. लोकसभेचे खासदार अनिल शिरोळे यांच्या मितभाषी स्वभावावरून सुरु झालेली चर्चा थेट दुसरे खासदार काकडे यांच्या बोलक्या स्वभावापर्यंत गेल्याचे बघायला मिळाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरोळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात पार पडले. त्यावेळी खासदार काकडे यांनी बोलताना शिरोळे यांचे काही अनुभव उपस्थितांना सांगितले. त्यात त्यांनी २०१४ साली मी तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे लोकसभेसाठी बापट यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला. त्यानंतर काकडे यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडूनही आले. पण त्यांनी याबाबत मनात काहीही ठेवलं नाही. त्यांनी यावेळी शिरोळे यांच्या मोजकं बोलण्याच्या स्वभावाचे कौतुक केले. याच व्यासपीठावर बापटही उपस्थित असल्याने त्यांनी उत्तर देणेही अपेक्षित होतेच. बापट यांनी नेहमीच्या खेळकर शैलीत शिरोळे यांच्या मितभाषी स्वभावाचे कौतुक केले. पण त्याच वेळी बोलताना काकडे यांना, 'शिरोळे कमी बोलतात तेव्हा त्यांना जास्त बोलायला सांगा आणि तुम्ही थोडं कमी बोलणं मनावर घ्या'असा सल्ला देताच प्रेक्षकात हशा पिकला. त्याच वेळी तुमचे बोलून झाले की मी बोलेन असे सांगायलाही ते विसरले नाहीत. अर्थात त्यांच्या या फटकेबाजीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरले नाही.