पुणे : शिवाजीनगर मतदारसंघातील झाेपडपट्टी भागात राहणाऱ्या रहिवाशांचे जीवनमान सुधारावे यासाठी भावी आमदाराने ग्राउंड पातळीवर विविध समस्यांवर काम करणे गरजेचे आहे. शिवाजीनगर परिसरात शाळा, महाविद्यालयांची संख्या जास्त आहे, त्यामुळे विद्यार्थिनींची सुरक्षिततेबाबत दक्षता घेणे, युवा वर्गाला राेजगार मिळवून देणे, नागरी सुविधा पुरविणे यासह निवडून आल्यानंतर पुढील पाचही वर्षे आमच्यासाठी काम करणारा आमदार हवा, अशी अपेक्षा येथील युवा वर्गाने व्यक्त केली.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या माेठी आहे. त्यांच्यासाठी अभ्यासिका, ग्रंथालय, सुविधा केंद्र आदी दर्जेदार सुविधा द्याव्यात. शिवाजीनगर मतदारसंघातील पाताळेश्वर, राेकडाेबा मंदिर, जंगली महाराज मंदिर आदी महत्त्वाच्या वारसास्थळांचे जतन करावे. - ओंकार मारणे, शिवाजीनगर गावठाण
गाेखलेनगर, पांडवनगर, वडारवाडी या भागात स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट आहे. खासकरून झाेपडपट्टी भागात प्रचंड अस्वच्छता पाहायला मिळते. त्यामुळे नागरिकांची माेठी गैरसाेय हाेते. वैद्यकीय उपचारही महागडे झाले असून, आमदाराने लाेकांना मदत करावी. - राज धाेत्रे, पांडवनगर
शिवाजीनगर, कसबा आणि काेथरूड या तिन्ही मतदारसंघांत शाळा, महाविद्यालये, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आणि वर्ग यांची संख्या माेठी आहे. या तिन्ही मतदारसंघांत मिळून महिला तसेच विद्यार्थिनींच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र महिला पाेलिस ठाणे स्थापन करणे गरजेचे आहे. - लावण्या शिंदे, शिवाजीनगर
मतदारसंघात एकीकडे उत्तम सुविधा आहेत, तर दुसरीकडे रस्त्यांची दुरवस्था अन् अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. राजकीय नेते निवडून येताच सक्रिय हाेतात आणि काही जुजबी कामे करतात. त्यानंतर प्रश्न तसेच राहतात. एसआरए इमारतीतही अनेक समस्या आहेत. त्या साेडविल्या पाहिजेत. - सनी जाेशी, वडारवाडी
मतदारसंघात बेराेजगारी माेठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे युवा वर्ग निराश आहे. भावी आमदाराने मतदारसंघातील युवा वर्गासाठी राेजगार मेळावे घ्यावेत. - अमर शिगवण, वडारवाडी