केडगाव : भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. कुल यांना निवडीचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वी पुणे जिल्हा ग्रामीणसाठी एकच जिल्हाध्यक्षपद असायचे. यावर्षीपासून यामध्ये बदल करत पुणे दक्षिण व पुणे उत्तर असे दोन जिल्हे निर्माण केले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्षांची नेमणुक केली आहे.
नवीन नियोजनानुसार या दोन्हीही ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एक प्रकारे आमदार राहुल कुल यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. आमदार राहुल कुल यांच्याकडे यापूर्वी बारामती लोकसभा निवडणूकप्रमुख पदाची जबाबदारी असून आत्ता पूर्ण ग्रामीण जिल्ह्याची समन्वयाची जबाबदारी देण्यात आल्याने जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यामुळे बळ मिळणार आहे. कुल हे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण मधील एकमेव आमदार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.
या निवडीबाबत आमदार राहुल कुल म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने माझ्यावर संघटनात्मकरुपी समन्वयाची जबाबदारी दिली असून ही दिलेली जबाबदारी मी निश्चितपणे चांगल्या प्रकारे पार पाडणार आहे. केंद्र व राज्य सरकारची विकासाची कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहचविले जातील याबाबत संघटनात्मक रचना करून ही कामे पोहचविली जातील. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रभारी नेमणुकीनंतर पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर जिल्हा समन्वयकाची जबाबदारी दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानून त्यांनी दिलेला विश्वास पुन्हा एकदा सार्थ करून दाखवणार आहे.