कोविडची साथ, टाळेबंदी अशा कारणाने हॉटेल, रेस्टॉरंट, जिम आदी उद्योग व्यवसायाला ( हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ) गेले सव्वा वर्ष आर्थिक तडाखा बसला आहे, त्यातून सावरण्यासाठी या उद्योगाला महापालिकेचा मिळकतकर आणि अन्य शासकीय करांमधून सवलत मिळावी ,अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, अम्युझमेंट पार्कस्, आणि जिम आदी फिटनेस सेंटर्स यावर तीन लाख नागरिकांचे जीवनमान अवलंबून आहे. गेल्या सव्वा वर्षात हा व्यवसायच सलगपणे चालू राहिला नाही आणि त्याचा परिणाम मालक, चालक,या सर्वांच्या उत्पन्नावर झाला आहे. उत्पन्न कमालीचे घटले काही हॉटेल, रेस्टॉरंट कायमची बंद पडले. हा उद्योग सावरण्यासाठी शासकीय मदतीची अत्यंत गरज आहे. याकरिता महापालिकेचा मिळकत कर, शासकीय परवाना शुल्क, वीजेचे शुल्क यात पूर्णतः सवलत मिळावी, ज्यायोगे हा व्यवसाय पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. गुजरात आणि अन्य काही राज्यांनी हा उद्योग आर्थिक पेचप्रसंगातून बाहेर पडण्यासाठी सवलती देऊ केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनेही या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने सवलतीचा निर्णय घ्यावा, असे आमदार शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.