वडगाव मावळ (पुणे) : कोट्यवधी रुपये खर्च करून मावळ तालुक्यातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची केल्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत, याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार सुनील शेळके सोमवारी अधिवेशनात केली.
तालुक्यातील विविध रस्ते, कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय, वडगाव येथील प्रशासकीय इमारत, मंडल व तलाठी कार्यालय यासह अनेक कामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. तालुक्यातील अनेक भागातील रस्त्यांची कामे चार-पाच महिन्यांपूर्वी झाली आहेत. मात्र अवघ्या काही दिवसात रस्त्याची चाळण झाली आहे. प्रस्तावापासून निधी मंजूर करेपर्यंत लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते, त्यानंतर ठेकेदाराला काम देणे ते काम दर्जेदार करून घेणे ही जबाबदारी अधिकाऱ्याची असते. परंतु तसे होत नाही. अधिकारी व ठेकेदार या दोघांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाची कामे केली जातात. अशा अधिकाऱ्यांची व ठेकेदारांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली.
तळेगाव दाभाडे शहरात अनेक कलावंत घडले असून, सांस्कृतिक कार्यक्रमाचे माहेरघर समजले जाते. त्यामुळे तळेगाव येथे नाट्यगृह उभारण्यासाठी मान्यता द्यावी, तालुक्यातील खेळाडूंनी छत्रपती पुरस्कार, सुवर्ण पदक व अनेक पदे पटकावून देशात मावळाचे नाव उज्ज्वल केले आहे. परंतु क्रीडा संकुलन नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. जांभूळ येथील गायरान जागेवर क्रीडा संकुलन बांधण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी केली.
लोणावळा शहरात काही वर्षांपूर्वी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. ही समिती नेमण्याचा उद्देश या भागातील अतिक्रमणांवर नियंत्रण राहावे असा होता. परंतु या समितीकडून सर्वसामान्य नागरिकांच्या, छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्या, शेड यावरच कारवाई होताना दिसते. शहरातील मोठ्या हॉटेलांसमोरील शेड, अतिक्रमण यावर कारवाई का होत नाही, असा सवाल आमदार शेळके यांनी यावेळी उपस्थित केला.