किरण शिंदे
पुणे : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची पुणे पोलिसांनी चौकशी केली. पुणे पोलिसांकडून तब्बल तीन ते चार तास आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी करण्यात आली. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमदार सुनील टिंगरे यांना चौकशीसाठी बोलावलं होते. मात्र या चौकशी मधून काय निष्पन्न झाले हे अद्याप समोर आले नाही.
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात १९ मे च्या पहाटे हा अपघात झाला होता. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात आलिशान पोर्शे कार चालवत दोघांचा जीव घेतला होता. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया या दोन तरुणांचा या घटनेत जीव गेला होता. बड्या बापाचा मुलगा असलेल्या अल्पवयीन कारचालकाने मद्याच्या नशेत कार चालवण्याचा आरोप आहे. अपघातानंतर अल्पवयीन कारचालक पळून जाण्याचा प्रयत्न होता. मात्र घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्याला पकडून मारहाण करत पोलिसांच्या हवाली केले होते.
दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर अल्पवयीन कारचालकाला वाचवण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी दबाव आणल्याचा आरोप आहे. अल्पवयीन कारचालकाची बाजू घेत आमदार सुनील टिंगरे येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते असा देखील आरोप करण्यात येतोय. मात्र आमदार सुनील टिंगरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. माझ्या मतदारसंघात ही घटना घडल्याने माहिती घेण्यासाठी गेलो होतो असे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले होते.
मात्र असे असले तरीही या अपघाताशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाची पुणे पोलिसांनी चौकशी केली. असे असताना आमदार सुनील टिंगरे यांना पोलीस चौकशीसाठी का बोलावत नाही असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. मात्र आता पुणे पोलिसांनी तीन ते चार तास आमदार सुनील टिंगरे यांची या प्रकरणात चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीत नेमकी काय निष्पन्न झाले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
पुणे पोलीस काय दडवतायत?
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात सुनील टिंगरे यांची चौकशी झाल्याचे सांगितले. मात्र पुणे पोलिसांकडून याविषयी अद्याप कुठलीही माहिती दिली जात नाही. आमदार महोदयांच्या चौकशीतून नेमके काय निष्पन्न झाले हे देखील स्पष्ट होत नाही. त्यामुळे पुणे पोलीस नेमकं काय लपवत आहेत असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.
टिंगरेंची झालेली चौकशी पुणे पोलीस का लपवतायेत?
पोर्शे कार अपघातानंतर गर्भश्रीमंत असलेल्या बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नामुळे पुणे पोलिसांवर चहुबाजूनी टीका झाली. त्या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. पोलिसांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः समोर येऊन प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली होती. आता मात्र आमदार टिंगरे याची झालेली चौकशी पुणे पोलीस का लपवत आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.