पुणे : महाराष्ट्रात विधानसभेच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक होणार असून २३ निकाल लागणार आहे. १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिताही लागू झाली आहे. अशातच उमेदवारीबाबत पक्षाच्या बैठका होत असल्याचे दिसून आले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीपासून अनेक उमेदवार इच्छुक असल्याचे समोर आले आहे. परंतु पक्ष कोणाला संधी देणार याबाबत निर्णय झालेला नाही. पुणे शहरात भाजपचे ७ आमदार आणि काँग्रेसचा १ आमदार होता. भाजपच्या आमदारांमध्ये अंतर्गत वाद आणि उमेदवारीबाबत रस्सीखेच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे स्रावांचे लक्ष लागून आहे.
कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवाडकर यांच्यात वाद झाल्याचे समोर आले होते. बालवाडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. बालवडकर कोथरुडमधून इच्छुक असल्याने त्यांना पक्षातून डावललं जातंय असा आरोप त्यांनी पाटील यांच्यावर केला होता.
पर्वती मतदार संघातून माधुरी मिसाळ आमदार होत्या. आता मात्र श्रीनाथ भीमाले यांनीही माधुरी मिसाळ यांच्या उमेदवारीला थेट आव्हान देत इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आमदार माधुरी मिसाळ यांनी मग मी कुठून लढू? असा प्रश्न पक्षालाच विचारला आहे.
खडकवासल्याचे भीमराव तापकीर यांच्या विरोधातही पक्षांतर्गत मोठी नाराजी दिसून येत आहे. तापकीर यांच्याविरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लोकसभेत शरद पवार गटाला खडकवासल्यातून भरगोस मतदान झाल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे खडकवासला हातातून जाऊन द्यायचा नसेल तर चांगला उमेदवार द्यावा असा सूर उमटत आहे. इच्छुकांमधे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, माजी नगरसेवक किरण दगडे यांची नाव पुढे येताहेत.
कसबा विधानसभा सध्या भाजपच्या ताब्यात नाहीये. मागील पोटनिडणुकीत धंगेकरांनी हेमंत रासनेंचा पराभव केला होता. मात्र आताच्या लोकसभेत कसब्यातून धंगेकरांना सरावात कमी मतदान झाले. याठिकाणी दोन्ही पक्षांना जोर लावूनच प्रचार करावा लागणार आहे. अशातच विधानसभेत भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीच मतदारसंघावर जोरदार दावा ठोकल्याने हेमंत रासने यांच्या उमेदवारीला चांगलंच आव्हान निर्माण झालंय. त्याबरोबरच कुणाल टिळकही या मतदारसंघातून इच्छुक असल्याचे समोर आले आहे.
शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे यांची प्रतिमा चांगली असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिवाजीनगर मतदारसंघातून अजून तरी कोणीही इच्छुक नसल्याची माहिती आहे. त्यामुळे सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून कांबळे बंधूंनाच आलटून पालटून किती वेळा उमेदवारी दिल्याची माहिती आहे. मलाच तिकीट मिळणार आणि मीच निवडून येणार असं कांबळे म्हणत आहेत. पण भाजपकडेही या मतदारसंघात दुसरा सक्षम पर्याय उपलब्ध असल्याचं दिसत नाहीये. गेल्या निवडणुकीत सुनिल कांबळे निसटत्या मतांनी निवडून आले होते. या निवडणुकीत पक्ष कांबळे यांना उमेदवारी देण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत