पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी बैठकीकडे आमदार, बहुतांशी नगरसेवकांची पाठ
By निलेश राऊत | Published: July 4, 2023 06:05 PM2023-07-04T18:05:49+5:302023-07-04T18:05:56+5:30
पुणे शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेसमधील एक मोठा प्रबळ गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट
पुणे: अजित पवार यांच्या महाबंडानंतर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणकोणते नेते, पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबत आहेत, याचा अंदाज घेण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी तातडीची कार्यकारिणी बैठक घेतली. मात्र या बैठकीकडे शहरातील विद्यमान आमदार, बहुतांशी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीला खासदार ॲड. वंदना चव्हाण, पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे, माजी शहराध्यक्ष जयदेव गायकवाड, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, कमल ढोले पाटील, माजी नगरसेवक ॲड.निलेश निकम, श्रीकांत पाटील, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, निलेश मगर, रविंद्र माळवदकर, काका चव्हाण आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान शहराध्यक्ष जगताप यांनी २३ माजी नगरसेवक बैठकीला आल्याचा दावा केला आहे.
मात्र सदर बैठकीला शहरातील आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, माजी नगरसेवक दीपक मानकर, सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, महेंद्र पठारे, दिलीप बराटे, दत्तात्रेय धनकवडे, कुमार गोसावी आदी प्रमुख पदाधिकारी यांनी पाठ फिरवली. तसेच प्रमुख कार्यकर्ते मतदार संघनिहाय अध्यक्ष व अन्य पदाधिकारीही यावेळी अनुपस्थित होते. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेसमधील एक मोठा प्रबळ गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान आजच्या बैठकीला अनुपस्थित असलेल्या आजी माजी आमदार, खासदार, नगरसेवक व अन्य पदाधिकारी यांची यादी पक्षनेतृत्वापर्यंत पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दत्तात्रेय धनकवडे, प्रदीप देशमुख यांच्या नावाची चर्चा
अजित पवार गटाकडून 'राष्ट्रवादी'च्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती केल्याने, त्यांच्याकडून स्वतंत्र कार्यकारिणी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहरातही शिवसेनेच्या शिंदे- ठाकरे गटाप्रमाणे 'राष्ट्रवादी' चेही दोन शहराध्यक्ष, दोन कार्यालये होणार हे आता निश्चित झाले आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या गटाचा पुणे शहराध्यक्ष माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे अथवा शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख या दोघांपैकी एकाची निवड केली जाणार असल्याचे सूत्रांकडून बोलले जात आहे.