कोरोना आढावा बैठकीला आमदारांची दांडी!अजित पवार न आल्याने आमदार देखील गायब?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 02:55 PM2021-06-25T14:55:18+5:302021-06-25T14:55:58+5:30
कोरोना बाबत लोकप्रतिनिधी किती गंभीर? विचारला जातोय सवाल
कोरोना बाबत लोकप्रतिनिधी खरंच गंभीर आहेत का असा सवाल आज पुण्यात विचारला जातो आहे. कारण कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला आमदारांनी दांडी मारलेले पाहायला मिळालं. एरवी अजित पवारांचा उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला वेळेआधीच हजर असणाऱ्या आमदारांना अक्षरशः फोन करून बोलावून घेण्याची वेळ आज आली.
पुण्यामध्ये दर आठवड्याला पालकमंत्री अजित पवार यांचा उपस्थिती मध्ये कोरोना आढावा बैठक होत असते. आज मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही बैठक घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार गिरीश बापट हजर राहिले. पण आमदारांनी मात्र या बैठकीला दांडी मारलेली पाहायला मिळाली. अजित पवार नसल्याचे माहित असल्यानेच आमदार बैठकीला गैरहजर राहिल्याचे सांगत देखील होते.फक्त राष्ट्रवादीचे नाही तर भाजपचे आमदार देखील बैठकीला फिरकले नाहीत. बैठक सुरू झाल्यानंतर अशोक पवार हे एकच आमदार हजर असल्याचे पाहून आमदारांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीचे शहरातील आमदार चेतन तुपे हे उशिराने बैठकीत सहभागी झाले.