पिंपळवंडी - पुणे-नाशिक महामार्गाच्या अपूर्ण कामांच्या व बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या समर्थकांसह शुक्रवारी चाळकवाडी टोलनाक्यावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत हा टोलनाका बंद केला.पुणे-नाशिक महामार्गाच्या अपूर्ण असलेल्या कामांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येत्या रविवारी (दि. १५) चाळकवाडी टोलनाका बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शुक्रवारी आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या रायगड या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या टोलनाक्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, खेड बाह्यवळणे व पुलाची कामे प्रलंबित आहेत. तसेच चाळकवाडी भटकळवाडी येथील शेतकºयांचे हक्काचे पैसे कोर्टात अडकले आहेत. अर्धवट कामांमुळे या प्रश्नाबाबत वारंवार बैठका घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. १५ मेपर्यंत आम्ही काम चालू करू; अन्यथा तुम्ही टोलनाका बंद करा, अशा सूचना केंद्रीय व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत दिल्या होत्या. परंतु पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवून अजून एक महिना वाट पाहण्याची तयारी दाखवली. विरोधकांनी सन २०१५ ते २०१८ या कालावधीमध्ये शेतकºयांकडे चुकूनही लक्ष दिले नाही. यामुळे हा टोलनाका बंद करण्याचा अंतिम इशारा दिला होता. हा टोलनाका आज ना उद्या बंद होणार आहे, ही बाब विरोधकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आधी टोलनाका बंद करण्याचे राजकारण केले व श्रेयवादाची लढाई सुरू केल्याची टीका सोनवणे यांनी केली. महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाचे काम करणाºया ठेकेदार कंपनीस वारंवार सांगूनही केंद्रीय वाहतूकमंत्रीनितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, जिल्हाधिकारी व शेतकºयांची फसवणूक करीत असेल तर त्यांना टोल वसूल करू दिला जाणार नाही, असे म्हणत टोल बंद केला. महामार्गाची संपूर्ण कामे झाल्याशिवाय टोलनाका सुरू करू दिला जाणार नाही, असा इशाराही सोनवणे यांनी यावेळी दिला.नारायणगाव : आमदार शरद सोनवणे यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, त्यांनी अनेक वेळा टोल बंद करून पुन्हा सेटलमेंट करून टोलनाका सुरू केला आहे. राष्ट्रवादीचे रविवारचे (दि. १५) टोल बंद आंदोलन होणारच, अशी माहिती राष्ट्रवादीचे राज्य युवक उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिली.जनतेच्या हिताच्या कामासाठी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच कटिबद्ध आहे. टोल बंदमुळे राजकीय स्टंट कोण करत आहे, हे जनतेला कळाले आहे. राष्ट्रवादीने जनतेच्या हितासाठी टोल बंद आंदोलनाला जनतेचा वाढता प्रतिसाद हा सोनवणेंना सलत असून सर्वसामान्यांनी पुकारलेल्या १५ जुलैच्या आंदोलनाचे श्रेय घेण्यासाठीच सोनवणे यांनी राजकीय स्टंट केला आहे. राष्ट्रवादीने २६ जून २०१८ ला टोल बंद आंदोलनाचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी, टोलचालक यांना दिले आहे.
चाळकवाडी टोलनाका आमदारांनी केला बंद, स्टंटबाजी असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:50 AM