लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील सर्व आमदारांनी आपला एक कोटींचा निधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर खर्च करण्यास परवानगी दिली आहे. यामुळेच पुणे जिल्ह्यातील बहुतेक आमदारांनी पंधरा ते तीस लाखांपर्यंतची रक्कम रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करण्याची शिफारस जिल्हा नियोजन विभागाला दिले आहे. मावळचे आमदार सुनील शेळके आणि भोसरीचे आमदार महेश लाडे यांनी रेमडेसिविर इंजेक्शन्स सोबतच ऑक्सिजन प्लॅंट उभारण्याची मागणी केली आहे. हे दोन्ही प्रस्ताव विशेषबाब म्हणून परवानगी मिळावी म्हणून शासनाला पाठविण्यात आले आहेत.
राज्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासनाने जिल्हा नियोजनचा ३० टक्के निधी कोविडवर खर्च करणे निश्चित केले. याचबरोबर सर्व आमदारांनी आपल्या विकास निधीतील प्रत्येकी एक कोटी रुपये देखील कोविडसाठी खर्च करण्यास परवानगी दिली आहे. पुणे जिल्ह्यात २२ आमदार असून, यातील बहुतेक प्रामुख्याने ग्रामीण भागातील आमदारांनी रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी खरण्याचे प्रस्ताव दिले आहेत. सध्या शहर आणि ग्रामीण भागात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन्ससाठी सर्वसामान्य रुग्णांची पिळवणूक होत आहे. अनेक खाजगी हाॅस्पिटलकडून तेराशे-चौदाशे रुपयांच्या इंजेक्शन्ससाठी आवाच्या सवा पैसे वसूल करत आहेत. यामुळेच सर्वसामान्य व गोरगरीब लोकांना सरकारी रुग्णालयात मोफत रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदारांनी रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करण्याचा अग्रह धरला आहे.
सध्या रेमडेसिविर इंजेक्शन्सची खुल्या बाजारातील विक्री पूर्णपणे थांबविण्यात आली असून, जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली थेट हाॅस्पिटलला रेमडेसिविर इंजेक्शन्स पुरवठा करण्यात येत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन्सची वाढती मागणी लक्षात घेऊन बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदीची तयारी दर्शविली आहे. परंतु बाजारातच रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा असून, आमदारांनी केलेली मागणी कागदावर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
-----
आमदारांचा निधी फक्त सरकारी रुग्णालयांसाठीच
आमदार निधीमधून खरेदी करण्यात येणारी रेमडेसिविर इंजेक्शन फक्त त्यांच्या मतदारसंघातील सरकारी किंवा जिल्हा रुग्णालयांनाच दिली जाणार आहेत. जिल्हा नियोजन विभागाने काही आमदारांच्या शिफारशीवरून खरेदीचे आदेश देखील दिले आहेत. परंतु रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांकडून साठा नसल्याने पुरवठा होत नाही. इंजेक्शनचा पुरवठा कधी केला जाईल याबद्दल देखील शाश्वती उत्पादक कंपन्यांकडून दिली जात नसल्याने सध्या तरी अडचण अशी स्थिती आहे.
-------
गोरगरीब रुग्णांना मोफत रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध व्हावीत
आज रेमडेसिविर इंजेक्शनसाठी गरीब व सर्वसामान्य रुग्णांचे हाल सुरू आहेत. कोविड रुग्णांना रेमडेसिविर हा एकमेव आधार वाटत असताना मतदारसंघातील गोरगरीब रुग्णांना ही रेमडेसिविर इंजेक्शन मोफत उपलब्ध व्हावीत याच प्रमुख उद्देशांने मी माझ्या विकास निधीतील ३० लाख रुपये रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदीचे पत्र नियोजन विभागाला दिले आहे. याशिवाय भविष्यातील गरज लक्षात घेऊन ऑक्सिजन प्लॅंट देखील उभारण्यासाठी पत्र जिल्हा नियोजन विभागाला दिले आहे.
- सुनील शेळके, मावळ, आमदार