पुणे: महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व शिरूर लोकसभेचे शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारफेरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. सहभाग उठून दिसावा यासाठी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा असलेले भगवे ध्वज हातात धरले होते.
मनसेचे संपर्क नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांनी महायुतीच्या नेत्यांबरोबर भाषणाची संधीही देण्यात आली. महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय झाल्याचे चित्र त्यामुळे दिसू लागले आहे. प्रचारफेरी खंडूजी बाबा चौकात थांबवून तिथे जाहीर सभा प्रस्तावित करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यानंतर लगेचच या सभेत वागसकर यांना बोलण्याची संधी देण्यात आली. प्रामुख्याने मोहोळ यांच्या कोथरूड भागातील मनसेचे अनेक कार्यकर्ते प्रचार फेरीत दिसत होते. शहराच्या अन्य भागातील पदाधिकारी किंवा कार्यकर्ते मात्र दिसले नाहीत.
दरम्यान मनसेच्या वतीने नेते शिरिष सावंत यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात मनसेचे पदाधिकारी काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांबद्दल तो आमच्या मान्यतेचा नाही, त्याच्या उमेदवारीवर आम्ही नाराज आहोत असे वक्तव्य प्रसिद्ध करत असल्याची दखल घेण्यात आली आहे. सावंत यांनी म्हटले आहे या पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तीत भूमिका असतील. पक्षाचा त्याच्याशी काहीच संबध नाही. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाला खंबीर नेतृत्व हवे म्हणून बीनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे व तीच पक्षाची भूमिका आहे. याची गंभीर दखल घ्यावी असा इशाराही सावंत यांनी निवेदनात दिला आहे.
आघाडीच्या पाठिंब्यावर लढली होती मनसे
मनसेने सन २०१९ नंतर झालेली विधानसभा निवडणूक कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. त्यांच्या वकिल आघाडीचे प्रमुख, माजी नगरसेवक किशोर शिंदे उमेदवार होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी त्यांना पुरस्कृत केले होते. शिंदे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे चंद्रकात पाटील हे कोल्हापूरात कोथरूडमध्ये आणलेले नेते होते. त्यांचा विजय झाला, मात्र शिंदे यांना ८० हजार इतकी लक्षणीय मते या मतदारसंघात होती.