पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते. यावेळी 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार असून, बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.
पाकिस्तान झिंदाबाद घोषणेचा निषेध करण्यासाठी पुण्यात आज मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी वंदे मातरम..पाकिस्तान मुर्दाबाद, पीएफआय मुर्दाबाद… अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच काहींनी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला. मोठ्यासंख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनांचीही चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.
सदर घडलेल्या प्रकरणानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिली आहे. तसेच PFIच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या, आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत, असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला आहे.
तत्पूर्वी, माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की, यापुढे पाण्यासाठी देखील ( पा ) उच्चारता येणार नाही, नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित असल्याचं राज ठाकरेंनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात, भारतात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करु, घोषणा देणार जिकडे असतील, तिकडे जाऊन त्यांना शोधून काढू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच पीएफआयकडून देशात अशांतता निर्माण करण्याचं षडयंत्र रचण्यात येत होतं, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.