पुणे : मनसेकडून सातत्याने मराठीच्या मुद्द्यांवरून आवाज उठविला जातो. याच खळखट्याक आंदोलने, मोर्चे यांच्यासह मनसेने कायमच अमराठी कंपन्यांना धडा शिकवला आहे. आता याच धर्तीवर पुण्यातील कोथरूडमधील कर्वेनगर चौकातील कै. नानासाहेब बराटे उड्डाणपूलाला सुशोभीकरणाच्या नावाखाली हिंदी भाषेत संदेश लिहिण्यात आले आहेत. याविरुद्ध कोथरूड विभागाच्या वतीने मनसेच्या वतीने आवाज उठवत गुरुवारी (दि. ११) आंदोलन करत कर्वेनगर येथील उड्डाणपुलाला काळे फासून त्याचा निषेध करण्यात आला.
पुणे शहरात विविध ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. मात्र या सुशोभीकरणाच्या दरम्यान मराठी भाषेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कर्वेनगर उड्डाणपुलाच्या इथे आंदोलन केले. यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मनसेचे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे म्हणाले, मनपाने हिंदी भाषा कामकाजात अधिकृतपणे वापरण्याचा एखादा नवा कायदा केला आहे का? की हळूहळू हिंदी भाषा किंवा इतर कोणतीही परप्रांतीय भाषा पुणेकरांच्या माथी मारून ती मनावर बिंबवण्याचा काही कावा सत्ताधाऱ्यांनी आखला आहे असा प्रश्न पडतो. एक तर हिंदी त्यात अशुद्ध हिंदी.परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कधीही सहन करणार नाही. पुणेकरांवर जबरदस्तीने लादलेल्या हिंदी भाषेचा आम्ही जाहीर विरोध करतो व निषेधही करतो.
"महाराष्ट्रात आणि त्यात पुण्यात तर फक्त मराठीच" हा मराठी भाषेच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. ह्यामध्ये मनसे खंबीरपणे मराठी माणसाच्या व मराठी भाषेच्या बाजूनेच उभी असेल, असेही धावडे यांनी यावेळी सांगितले.