पुणे- तुम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडिबिलिटी घालवत आहे. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं, अशी टीका मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आजच्या पुण्यातील भाषणात केली.
बाळासाहेब आणि शरद पवारांची मैत्री वर्षानुवर्षे होती. मला असे वाटते की, आज महाविकास आघाडीचे सरकार झाले आहे. एक युती झालीय, मैत्री झालीय ती बघायला मोठे साहेब (बाळासाहेब) असायला हवे होते. त्यांना ही युती पाहून आनंद झाला असता, असं विधान मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. यावर देखील राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.
तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी बोललं की, महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं, असं राज ठाकरे म्हणाले.
संभाजीनगरचा उल्लेख करताना, नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या विधानाचा चांगलाच समाचार राज ठाकरे यांनी आज घेतला. संभाजीनगर नाव होवो की न होवो, मी म्हणतोय ना?... अरे तू कोण आहे?, सरदार वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी?, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच लवकरात लवकर औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करा, अशी मागणी देखील राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.