पुणे/मुंबई- विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना बुधवारी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आणि बघता, बघता आमदारांनी पायरी सोडली. शिवीगाळ, धक्काबुक्की आणि चौकातील गावगुंडाच्या भांडणासारखी आमदार मंडळी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा लाजिरवाणी आणि धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. विधानभवन ही पवित्र वास्तू असल्याचा उल्लेख सर्वच पक्षाचे आमदार करत असतात. मात्र, त्याच पवित्र वास्तूच्या पायऱ्यांवर हा अभूतपूर्व प्रसंग घडल्याने सर्वजण अवाक झाले.
सदर घडलेल्या प्रसंगावर राज्यातील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यातच आता मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी देखील सदर प्रकरणावर टीका केली आहे. आपल्याकडे असे कधीच झाले नव्हते. ही यूपी-बिहारकडे वाटचाल असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच या घटनेचा निषेधही राज ठाकरेंनी केला आहे. प्रभागातील सदस्य संख्या वाढवण्याचे काम राष्ट्रवादीने प्रथम केले होते. प्रभाग रचना सातत्याने बदल्याने नगरसेवकांना काम करता येत नसल्याचं राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात केली. सर्व राजकीय पक्षांमध्ये मनसेने याबाबत आघाडी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी मनसेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मोठी जबाबदारी देत असल्याचे म्हटले होते. तसेच पुणे दौऱ्यावर जात असून तिथे कोणत्याही बैठका ठेवू नका असेही म्हटले होते. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यात सदस्यनोंदणीला सुरुवात केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी नवीन घोषवाक्य जाहीर केले. 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक', असं मनसेचं नवं घोषवाक्य आहे. सदस्यनोंदणीला सुरुवात झाल्यावर राज ठाकरेंनी आजपासून राज्यभरात मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. मी पहिली सदस्य नोंदणी केली आहे. मला मनसेचे सदस्य करून घेतले, मनापासून आभार मानतो, असे म्हटले.
दरम्यान, गणेशोत्सव, दसरा, नवरात्र, दिवाळीत अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक मोहिम उघडली जाणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी, चौकात मनसेचे बॅनर, पोस्टर लागले पाहिजेत. ते कसे असावेत, काय काय असावे हे तुम्हाला कळविले जाईल. परंतू, मला ते सर्वत्र दिसायला हवेत असेही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.