पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे दौरे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील महापालिका निवडणुकांची रणनीती आखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून स्वतः पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात विशेष लक्ष घातले असल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या काही वर्षात पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उमेद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. मनसेच्या नव्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पुण्यात आलेल्या पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याला पुन्हा आणखी तीन दिवस दिले आहेत. या तीन दिवसीय दौ-यात विधानसभानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत.
मनसेला २०१२ झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये पुणेकरांनी साथ देत तब्बल २९ नगरसेवक निवडून दिले होते. मात्र, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत ही संख्या अवघी दोन नगरसेवकांवर आली. पक्षाच्या संघटनात्मक कामातही मोठ्या प्रमाणावर मरगळ आली होती. स्थानिक पदाधिका-यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली होती. ही गटबाजी विधानसभा निवडणूक आणि पदवीधर निवडणुकीमध्येही प्रकर्षाने समोर आलेली होती. पक्षाचे नेतृत्वही संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पदाधिकारी खासगीत बोलत होते.
विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला चमकदार कामगिरी करता आली नाही. आता, पालिका निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद आजमावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील बारा ते चौदा महापालिकांच्या संभाव्य निवडणुकांसाठी मनसेने पुन्हा जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आता राज्यभर दौरे करु लागले आहेत. नाशिकचा दौरा संपल्यानंतर ठाकरे पुणे दौ-यावर येत आहेत.
ठाकरे हे रविवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाले असून आजपासून पुढील तीन दिवस विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेणार आहेत. तसेच बुधवारी कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या संस्था आणि व्यक्तींशी चर्चा करून त्यांचा सन्मान करणार आहेत. आगामी निवडणुक आणि संघटनात्मक बांधणीविषयी गांभीर्याने चर्चा केली जाणार असल्याचे मनसे नेते सांगत आहे.===राज ठाकरे हे आज वडगाव शेरी व शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून कोथरूड व खडकवासला मतदार संघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत. मंगळवारी सकाळी हडपसर व कॅन्टोन्मेंट मतदार संघ, तर दुपारी कसबा व पर्वती मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत.