पुणे : मनसेप्रमुखराज ठाकरे हे रोखठोक स्वभावासाठी ओळखले जाते. तसेच ठाकरे यांचा चाहता वर्ग मोठा असून तो सर्व वयोगटात असल्याचे आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. आगामी काळात होणाऱ्या पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली असून राज ठाकरे यांचा पंधरा दिवसांच्या आतच दुसऱ्यांदा पुणे दौऱ्यावर आले आहे. पण याच दौऱ्यावेळी ठाकरे यांच्या भेटीसाठी एका चिमुकल्या 'फॅन'ने चक्क आपल्या आईशी भांडण करत अखेर त्यांची 'ऑटोग्राफ' मिळवलीच.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने जय्यत तयारी सुरु केली आहे. या धर्तीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर आले आहेत. सकाळीच ९.३० च्या सुमारास राज ठाकरे नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा पंधरा दिवसांच्या आत हा दुसरा तीन दिवसांचा दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या बैठका, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद असे अनेक कार्यक्रम ठरले असल्याने त्यांचा दौरा साहजिकच प्रचंड व्यस्त असणार आहे. पण याच भेटीवेळी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी तिसरीत शिकणाऱ्या सोहम जगताप या चिमुकल्याची धडपड सुरु होती. राज ठाकरे गाडीत बसण्यासाठी जात असताना आईशी भांडण करून तो वही आणि पेन घेऊन राज ठाकरेंच्या दिशेने धावला. त्याने ठाकरे यांच्याकडे ऑटोग्राफची मागणी केली. त्याच्या मागणीला राज यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.. पण सही कशी करू हा प्रश्न निर्माण झाला असतानाच त्यांनी पुणे शहर मनसेचे अध्यक्ष वसंत मोरे यांच्या पाठीचा आधार घेत आपल्या चिमुकल्या फॅनला ऑटोग्राफ दिला. आपल्या लाडक्या नेत्याची सही मिळाल्यामुळे हा चिमुकला कमालीचा भारावून गेला.राज ठाकरे यांनी त्याच्याशी काही क्षण संवाद साधला व पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावेळी उपस्थित सर्वजण अचंबित झाले.
...अन् राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले, 'मी काय कुंद्रा आहे का?'राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाल्यानंतर सर्व पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्सने त्यांचे फोटोज, व्हिडीओ घेण्यासाठी गर्दी केली होती. बराचवेळ फोटोग्राफर फोटोज क्लिक करत होते, हे पाहून राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. फोटोग्राफर्सकडे पाहून राज ठाकरेंनी हसत म्हटलं, सर्व आलं का कान.. नाक? किती वेळा तेच तेच, असं म्हणत 'मी काय कुंद्रा आहे का?', असं मिश्किल भाष्य राज ठाकरे यांनी केलं.
राज ठाकरे यांचा पुण्यात तीन दिवस मुक्काम पुणे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे नाशिक मुंबईकडे लक्ष देणार आहे. राज ठाकरे यांनी नुकताच पुण्यात तीन दिवस मुक्काम करून सर्व मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रभागप्रमुख आदींशी चर्चा केली. त्यानुसार २८ ते ३० जुलै असा तीन दिवसीय दौरा निश्चित करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कसबा, पर्वती आणि हडपसर या मतदारसंघाच्या मुलाखती होणार आहेत. गुरुवारी शिवाजीनगर, कोथरूड आणि कँटोन्मेंट मतदारसंघाच्या व शुक्रवारी खडकवासला, वडगावशेरी मतदारसंघाच्या मुलाखती होणार आहे.