मनसेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. 'तात्या, कधी येताय, वाट पाहतोय, असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल भाषेत वसंत मोरेंना राष्ट्रावादीत बोलवल्याचं स्वत: वसंत मोरे यांनी सांगितलं.
वसंत मोरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं. त्यामध्ये मी देखील गेलो होतो. त्यावेळी नेमके माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील आले. त्यानंतर आम्ही सर्व स्टेजवर जाऊन आलो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याशी मी बोलत असताना अजित पवार तेथे आले. मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाही अजित पवारांनी मला आवाज दिला आणि माझ्या छातीवर थाप मरुन दादा म्हणाले, अरे तात्या, किती नाराज...आता या आमच्याकडे...मी वाट बघतोय, असं म्हणाले.
लग्नातून जाताना अजित पवार पुन्हा म्हणाले, वसंतराव, मी तुमची वाट बघतोय..आपल्याला भेटायचं आहे. अजित पवारांच्या या विधानवर मी हो, असं म्हटलं. मला असं वाटतं की, हा मी केलेल्या कामाचा गौरव असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. पुणे शहरातील पक्षामधून मला डावलंल जातंय. मला लक्ष्य केलं जातंय. मला पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. तरीसुद्धा मी कार्यक्रमाला जातो. मला स्टेजवर बसवलं जातं, मात्र भाषणासाठी वेळ दिला जात नाही. या सगळ्या गोष्टी मी मनसेप्रमुखराज ठाकरे यांना सांगितल्या आहेत. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की, पुण्यात आल्यानंतर एक बैठक घेऊ आणि काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली.
सध्या मी मनसे पक्षातच आहे. आगामी निवडणुकी जवळ येताय. त्यावेळी वसंत मोरे कुठे असतील, असा प्रश्न वसंत तात्यांना विचारला असता, मी सध्या कुठल्याही वाटेवर नाही. परंतु पक्षनेतृत्व आणि पक्ष याच्यावर मी नाराज नाही. मात्र पुण्यातील जी कार्यकारणी आहे, ती मला वारंवार डावलतेय. माझी कामे आणि सामान्या लोकांमधील असलेली प्रसिद्धी या लोकांना बघवत नाही, असं म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला घराचा आहेर दिला. तसेच राज ठाकरेंना वारंवार सांगूनही मला टाळण्यात येतंय. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळी मला वाटलं राज ठाकरे पुण्यातील नेत्यांना काहीतरी बोलतील, मात्र असं काहीच झालं नाही, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मी मनसेतून गेल्यास पक्षाला फरक पडेल, परंतु इथल्या स्थानिक नेत्यांना आनंद होईल, असा दावा देखील वसंत मोरे यांनी केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली होती. मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे मनसेवर नाराज असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र वसंत मोरे आणि संजय राऊतांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. संजय राऊतांनी वसंत मोरेंच्या कामाचं कौतुक केलं होतं. त्यामुळे वसंत मोरे शिवबंधन बांधणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला होता. वसंत मोरेंना राऊतांनी 'तात्या' म्हणून हाक देखील मारली होती. मात्र त्यानंतरही वसंत मोरे यांनी पक्ष सोडणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. दोन्ही पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांकडून ऑफर आल्या आहेत. मात्र वसंत मोरे त्यांच्या मनसे न सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसत आहे.
निलेश लंके यांनीही दिली ऑफर-
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासंदर्भात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी त्याला विरोध केला होता.राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी आमदार निलेश लंके यांची भेट झाली होती. वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसनेही यापूर्वी पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"