पुणे- आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात मनसेही सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पक्षाचे नेते, सरचिटणीस यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर मनसेनं विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले आहेत. त्यात बारामती लोकसभेसाठी वसंत मोरे यांना निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
वसंत मोरेंची बारामती लोकसभा निरीक्षक पदी निवड झाल्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. साहेबांनी सांगितले ना तर बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ...कारण मराठ्याची जात कधी मागं पुढं बघत नाय...आणि हो बारामती लोकसभा म्हणजे फक्त बारामती नाय बाबांनो, त्यात भोर , वेल्हा , मुळशी , पुरंदर , हवेली , दौंड , इंदापूर आणि पुणे शहर हे ही आहे बरं का...म्हणून तर म्हणलो मी येतोय..., असं वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्या सहीनं पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून किशोर शिंदे, हेमंत संभूस, गणेश सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघात अजय शिंदे, बाळा शेडगे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे, सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. वसंत मोरे हे पुण्यातील कात्रज भागातील मनसे नगरसेवक आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून ते राज ठाकरेंसोबत आहेत.
दरम्यान, मध्यंतरीच्या काळात वसंत मोरे यांना पक्षाने पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत मशिदीवरील भोंगे हटवण्याचं आंदोलन हाती घेतलं. त्यावर मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली. मोरे यांच्याजागी साईनाथ बाबर यांना शहराध्यक्षपदी नेमण्यात आलं होतं.