खासदार शरद पवार आज पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते वसंत मोरे खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
खासदार शरद पवार हे आज बारामती लोकसभा मतदार संघातील मोर्चेबांधणीसाठी दौऱ्यावर आहेत. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे येथील निसर्ग कार्यालयात आयोजित केली आहे. दरम्यान, आता या कार्यालयात मनसे नेते वसंत मोरे पोहोचले आहेत. लोकसभेसाठी शरद पवार वसंत मोरेंची मदत घेणार अशी चर्चा सुरू आहे.
'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया
शरद पवार घेणार बारामती मतदार संघाचा आढावा
देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. सर्वपक्षांकडून तयारीही सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाकडून बारामती लोकसभा मतदार संघात उमेदवार देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दौरेही सुरू केले आहेत, त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार असणार अशी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांनी बारामती पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी स्वत: शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत.
बारामतील लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत मानली जात आहे. या संदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आज खासदार शरद पवार मैदानात उतरले आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकांच्या माध्यमातून ते आढावा घेणार असून पुढच्या सूचना देणार आहेत.