पुणे : गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून अनरिचेबल असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मोरे यांनी एक वॉट्सअप स्टेटस ठेवले आहे. ज्यामध्ये, तुम्हाला जर विरोध किंवा संघर्षाला सामारे जावे लागत नसेल तर तो रस्ता बदलावा, या आशयाचे स्टेटस मोरे यांनी ठेवले आहे.
नेमके हे स्टेटस काय आहे-
"स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याच्या जीवनात संघर्ष आहे. दररोज काहीतरी अडचणी आहे, दररोज कोणीतरी निंदक आहे. दररोज विरोध आहे त्यानं समजावं आपण योग्य आहे....ज्याच्या जीवनात विरोध नाही, निंदा नाही, आणि संघर्ष नाही त्यानं लवकर रस्ता बदला, आपण चुकीच्या दिशेने प्रवास करतोय"
वसंत मोरे नाराज?
वसंत मोरे यांची नाराजी आता लपून राहिली नाही. राज ठाकरे यांच्या भोंग्या विरोधातील भूमिकेनंतर वसंत मोरे नाराज झाले होते. आपली नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली. तडकाफडकी त्यांना पुणे शहर अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते. परंतु त्यांची नाराजी आता पुन्हा एकदा दिसून आली. त्यांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटस वरून पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले.
पुण्यात मनसेचे आंदोलन अन् मोरे बालाजीच्या दर्शनाला-
काल पुणे शहरात अनेक ठिकाणी मनसेकडून महाआरती ठेवण्यात आली होती. अनेक मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकडही केली. मनसेचे एवढे मोठे आंदोलन राज्यभर सुरू असताना वसंत मोरे तिरूपतीला बालाजीच्या दर्शनाला गेले होते. यामुळे मोरे राज ठाकरेंची साथ सोडणार का? असाही प्रश्न समाजमाध्यमांवर विचारला जात आहे.