पुणे : परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या खोचक टीकेला अभिनेता नाना पाटेकर यांनी आज उत्तर दिले. राज ठाकरे यांचे वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं, असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचे सांगितले. पुण्यात एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्या वेळी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. फेरीवाल्यांची बाजू घेत ते म्हणाले, ‘राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला होता आणि मी माझा. प्रत्येकाला बोलण्याचा, मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. फेरीवाल्यांना त्यांना एक हक्काची जागा द्यावी. यानंतरही ते पदपथांवर बसत असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी.’ पद्मावती चित्रपटाबाबत नाना म्हणाले की, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटात काय आहे हे कळेल; पण जर कुणी ‘मारेंगे-काटेंगे’ अशी भाषा वापरत असेल तर ते मला मान्य नाही. हे योग्य नाही. नाक कापण्याची, जाळून मारण्याची धमकी देणे गैर आहे; मात्र मुळात वाद होतात कसे, मी इतके चित्रपट केले, मात्र कधी वाद झाले नाहीत. ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट झाल्यानंतर, मला तो आवडला नव्हता. बºयाचदा वाद झाला की प्रसिद्धी मिळते; पण सातत्याने वाद होत असेत तर निर्मात्यांनी चित्रपटाची तपासणी करावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून ‘न्यूड’ आणि दुर्गा या चित्रपटांबाबत त्यांना विचारले असता, चित्रपटाबाबत माहिती घेऊन बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. एनडीएमध्ये मोठे बदल झाले आहेत. सामान्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या पाल्यांना एनडीएमध्ये दाखल होण्यासाठी प्रोत्साहित करावे ही इच्छा आहे. मी या ठिकाणी विद्यार्थ्यांचा नाही, तर माझा उत्साह वाढवायला आलो आहे. सध्या सामाजात घडत आहे ते पाहूण खूप दु:ख होते; मात्र या तरुणांना पाहुण ऊर्जा मिळते. देशांच्या सीमांच्या रक्षणाची जबाबदारी केवळ लष्कराची नाही तर इतर सशस्त्र दलांचीही आहे. अत्यंत बिकट परिस्थित ते देशांचे संरक्षण करीत आहेत. त्यांच्यामुळे लष्कराने काय करावे, यापेक्षा आपण काय करायला हवे ते बघणे गरजेचे आहे. कारण, सीमेपेक्षा देशांतर्गत प्रश्न खूप आहेत. आज आपण आपापसांत भांडत आहोत, याचा फायदा स्वार्थी राजकारणी घेत आहेत. हे आधी बंद व्हायला पाहिजे.
प्रत्येकाला लष्करी प्रशिक्षण सक्तीचे हवेलष्करी प्रशिक्षणाबाबत मी ‘प्रहार’ चित्रपटावेळीच बोललो होतो. प्रत्येकाला लष्करी प्रशिक्षण सक्तीचे केले पाहिजे. एका वर्षात खूप ऊर्जा मिळते. जोपर्यंत एकावर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले जात नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू नये, असे माझे मत आहे. यावर आधी चर्चा झाली होती; मात्र पुढे ती का थांबली, याचे कारण माहीत नाही.
काय बोलले होते राज ठाकरे - 'महात्मा नाना पाटेकर आज काहीतरी बोललेत ? नाना पाटेकर बोलताना 80 वर्षाच्या आजोबांचा एक टोन असतो', अशी टीका करताना राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची नक्कलही करुन दाखवली. 'वेलकममध्ये भाजा विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहे', अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली. 'नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावं. नाना पाटेकर मराठीतला उत्तम कलावंत आहे, तुमचे चित्रपट बघू...पण नको त्या गोष्टीत पडू नका', असं राज ठाकरे म्हटले होते.
राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना नाम संस्था सुरु करण्यावरुन प्रश्न विचारले. 'महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्नही सरकारने सोडवायचा आहे, मग कशाला संस्था काढली. संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं. जिथे सरकारला जमत नाही, तिथे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ना मग आम्हाला शिकवायचं नाही', असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं .
'मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही', असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. आम्ही तुझं अभिनंदन केलं पाहिजे तिथे संजय निरुपम कौतुक करतो असं सांगत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी राज ठाकरेंनी दाक्षिणात्य नेते आणि अभिनेत्यांचं पुन्हा एकदा उदाहरण दिलं. पहा ते कसे एकत्र येतात. तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका, पण चोमडेपणा कशाला करता. महाराष्ट्रात आमचंच कुंपण शेत खातय असा टोला राज ठाकरेंनी लगावला.