पुणे : शहरात मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांमध्ये पडून नागरिक जखमी होत असताना महापालिका काहीही करत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अनोखे तिरडी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कोथरूड भागातील खड्ड्यावर चक्क तिरडी ठेवण्यात आली.
पुणे शहरात गेले चार दिवस पाऊस सुरु होता.त्यामुळे पेठ भागासह उपनगरांमधील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात होत असून पाच दिवसाच्या पावसात खड्डे पडलेच कसे असा सवाल विरोधी पक्षांतर्फे विचारण्यात येत आहे. मुंबई येथील खड्ड्यांच्या आंदोलन केल्यावर मनसे कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीवर काल राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता मुंबई पाठोपाठ खड्ड्यांच्या मुद्द्यावर पुण्यातही मनसे आक्रमक झाली असून त्यांनी तिरडी ठेवून निषेध केला.
यावेळी शहर सचिव प्रशांत कनोजिया म्हणाले की, गेले वीस दिवस आम्ही या खड्ड्यांची तक्रार करत होतो. आंदोलन करण्याआधी महापालिकेला इशारा दिला होता. अखेर आंदोलन केल्यावर अर्ध्या तासात रस्त्याची दुरुस्ती सुरु झाली.