काँग्रेसच्या बंदमध्ये मनसे, राष्ट्रवादीचा सक्रिय सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 08:31 PM2018-09-09T20:31:18+5:302018-09-09T20:32:59+5:30
काँग्रेसच्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड आदी विविध पक्षांनी सक्रिय पांठिबा दिला आहे.
पुणे: पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने अवास्तव आणि अन्याय्य दरवाढ होत असल्याच्या निषेधार्थ, मोदी मुक्त भारत, मोदी हटवा देश वाचवा मोहिम हाती घेत काँग्रेस पक्षाने सोमवार (दि. १०) रोजी भारत बंद पुकारला आहे. काँग्रेसच्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड आदी विविध पक्षांनी सक्रिय पांठिबा दिला आहे. मनसेच्या वतीने रविवारी शहरातील लक्ष्मीरस्त्यासह प्रमुख बाजारपेठांमध्ये रॅली काढून बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस कमिटीच्या चिटणीस व महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विविध व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, हमाल पंचायत , शैक्षणिक संस्था , सराफ व्यावसायिक, पेट्रोल डीलर असोसिएशन आदींना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे बागवे यांनी सांगितले. बंदा निमित्त दुपारी १२ वाजता ट्रायलक हॉटेल, पुणे कॅम्प येथे काँग्रेस पक्षाचे सर्व नेते , पदाधिकारी जमून कॅम्पमधील विविध व्यापारी संघटनांना व दुकानदारांना बंद पाळण्याचे आवाहन करणार आहेत. या बैठकीस माजी आमदार मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नीता रजपूत, अजित दरेकर, रमेश अय्यर, संगिता तिवारी, चैतन्य पुरंदरे, सचिन आडेकर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेचा सक्रिय सहभाग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख पदाधिका-यांची बैठक घेऊन बंदात सक्रिय सहभाग घेण्याचे निश्चित करण्यात आले. बंद शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी रविवारीच सर्व प्रमुख बाजार पेठांमध्ये रॅली काढून व्यापा-यांना बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- अजय शिंदे, मनसे शहर प्रमुख