पुणे : महापालिकेच्या वतीने डिसेंबर २०१७ मध्ये घेतलेल्या महापौर चषक स्पर्धेतील विजेत्यांना अद्याप पैसे दिले नाहीत. विजेत्यांना बक्षीसाची रक्कम तातडीने मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेचे क्रीडा अधिकारी तुषार दौंडकर यांच्या कार्यालयात कॅरम खेळून निषेध व्यक्त केला. मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी कार्यकर्त्यासह हे आंदोलन केले.
महापालिकेच्या वतीने दर वर्षी शहरामध्ये विविध क्रीडा प्रकाराचे महापौर चषक स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये डिसेंबर २०१७ मध्ये कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये शहरातील तब्बल दीड हजार ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रीडासंघटकाची नेमणूक करण्यात आली होती. बक्षीसाची रक्कम थेट बँकेत जमा करण्यात येणार होती. त्यामुळे या संघटकांनी स्पर्धकाचा बॅँक अकाऊन्ट नंबरही घेणे बंधनकारक केले होते. त्यानुसार ते घेण्यात आले.
प्रत्येक लेव्हलला ३०० रुपये असे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यानुसार अनेक स्पर्धक स्पर्धा जिंकत चार-पाच लेव्हलपर्यंत स्पर्धा जिंकली आहे. असे असतानाही विजेत्या स्पर्धकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली नाही. त्याबाबत स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक विजेत्यांनी याबाबत पालिकेकडे तक्रार केली असून ही बक्षिसांची रक्कम देण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या बोगस कारभाराच्या विरोधात मनसेच्या वतीने आंदोलन घेतले.
तातडीने धनादेश देणार
महापालिकेच्या वतीने या स्पर्धा घेण्यासाठी खाजगी संस्थांची नियुक्ती केली होती. या संस्थेने कॅमरसाठी ८०० स्पर्धकांच्या बक्षीसाची मागणी केली होती. परंतु प्रत्यक्षात स्पर्धेत १५०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली असून ज्या स्पर्धकांना बक्षिसांची रक्कम मिळालेली नाही. त्याचे धनादेश तयार करण्यात येत असून, तातडीने देण्याची व्यवस्था केली जात आहे.
- तुषार दौंडकर, उपायुक्त व क्रीडा अधिकारी