पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्यात दहशत पसरवली. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात तरुणीवर भर दिवसा एका माथेफिरूने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली. पुण्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात एका तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तीन जिगरबाज योद्ध्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विविध राजकीय पक्षातील नेते मंडळींनी या योद्ध्यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या जिगरबाज तरूणांचा पुणेरी पगडी व शाल देऊन सन्मान केला.
राज ठाकरे यांनी केलेल्या सन्मानाचा व्हिडीओ मनसे आमदार राजू पाटील यांनी शेअर केला आहे. "पुण्यात घडलेल्या मुलीवरील हल्ल्याप्रकरणी ज्या तरूणांनी जीवावर उदार होऊन त्या मुलीचे प्राण वाचवले असे हर्षद पाटील व लेशपाल जवळगे यांचा राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुणेरी पगडी व शाल देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक राजसाहेबांनी केले व भविष्यात कोणत्याही मदतीस उपलब्ध आहे असे आश्वासित केले", असे राजू पाटील यांनी सांगितले.
घटनेनंतर शहर पोलीस दल खडबडून जागे तरुणीवर भर दिवसा एका माथेफिरूने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण शहर पोलीस दल खडबडून जागे झाले. महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची गस्त वाढविण्यात येणार असून, बीट मार्शलची संख्या वाढवली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले. तर आता पुण्यात कोयता घेऊन फिरणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशा माथेफिरूंना तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो असा सज्जड दम पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिला आहे.