पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ५३ फूट भव्यदिव्य भिंतीवरील चित्राचं आज अनावरण करण्यात आलं आहे. मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते या भिंतीचित्राचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला मनसे नेते अनिल शिदोरे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे शहर मनसे अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून राज ठाकरेंचे हे भव्य भिंती चित्र साकारण्यात आलं आहे.
७ दिवसांत चित्रकार निखील खैरनार यांनी राज ठाकरेंचे भव्यदिव्य चित्र साकारलं आहे. या कार्यक्रमात आमदार राजू पाटील यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात वसंत मोरे म्हणाले की, माझ्या नेत्यावर असलेले प्रेम मी व्यक्त करू शकत नाही. माझा नेता देशात, राज्यात सर्वोच्च पातळीवर असावा हीच माझी इच्छा आहे. त्यासाठी त्याची सुरुवात पुण्यातून करणार आहे. राज ठाकरेंचा पुढील वाढदिवस हा पुणे महापालिकेत साजरा करायचा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर गेल्या अनेक दिवसांपासून वसंततात्या कार्यक्रमाला बोलवत होते. याआधीही बोलावलं होतं परंतु काही कारणास्तव जमलं नाही. मात्र यंदाच्या कार्यक्रमाला यायच्या आधी मी एक क्लिप पाहिली तात्या हातोडा घेऊन आंदोलन करत होते. त्या भीतीनं मी इथे आलो. कारण आज आलो नसतो तर तात्या आंदोलनाला आमच्याकडे आले अशा विनोदी शैलीत वसंत मोरे यांच्या कामाचं कौतुक आमदार राजू पाटील यांनी केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. दरवर्षी राज ठाकरेंच्या दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते येत असतात. पण मागील २ वर्षापासून देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट आल्यापासून राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी जाता येत नाही. या वर्षीही राज ठाकरेंनी पत्राद्वारे आवाहन करून कार्यकर्त्यांना जिथे असाल तिथून समाजोपयोगी काम करा असं आवाहन केले होते.
नवी मुंबईत ५३ हजार पुस्तकांचे वाटप
राज ठाकरेंनी या पत्रातून वाढदिवसाला घरी न येता जिथे आहात तिथून पूर्ण काळजी घेऊन कामात राहा, समाजोपयोगी काम करा. त्याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्वीकारेन असं त्यांनी सांगितले होते. राज ठाकरेंच्या या आवाहनाला नवी मुंबईतील मनसेचे नेते गजानन काळे यांनी मनापासून प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. राज यांच्या वाढदिवसानिमित्त काळे तब्बल 53 हजार पुस्तके वाटणार आहेत. माणसांचे हात सुटत जाताना, पुस्तकांचे हात धरावे.! मनावरल्या लाख ओझ्याचे, थोडे हलके गीत करावे.!, असे म्हणत राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ५३ हजार घरी पुस्तक भेट देण्याचा संकल्प काळे यांनी जाहीर केला आहे.