पुणे : कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर हा वाद पुन्हा वर आला होता. कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड झाल्यानंतर आता पुण्यात कर्नाटकच्या वाहनांना त्याचा फटका बसला आहे. कर्नाटकात झालेल्या उच्छादाला महाराष्ट्रातूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. सकाळी पुणे शहरात शिवसेनेकडून कर्नाटकातील गाडयांना काळे फासण्यात आले होते. आता मनसेकडून मुंबई बंगलोर महामार्गावर कर्नाटकच्या दिशेने जाणारी बस रोखून मनसेचे आंदोलन करण्यात आले आहे.
मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बस रोखून हे आंदोलन केले. त्यांनी कर्नाटकला जाणाऱ्या बसवर कलर स्प्रे मारून जय महाराष्ट्र मनसे असे लिहिण्यात आले आहे. तसेच शिवसेनेने दुपारी स्वारगेट डेपोजवळ उभ्या असलेल्या कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासून त्यावर जय महाराष्ट्र लिहून निषेध नोंदविला आहे. जर मराठी लोकांना किंवा महाराष्ट्राच्या गाड्यांना कर्नाटकात त्रास दिला तर आम्ही एकही कर्नाटकची गाडी येऊ देणार नाही असं आंदोलकांनी सांगितले. बेळगाव सीमेवर महाराष्ट्राच्या गाड्या कर्नाटकमधील नागरिकांनी फोडल्या असून आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असंही यावेळी आंदोलकांनी सांगितले. अनेक आंदोलकांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं आहे. स्वारगेट परिसरात कर्नाटकच्या गाड्या लावल्या जातात. तिथं जाऊन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध नोंदविला. महाराष्ट्र गाड्यांवर जर कर्नाटकात हल्ला झाला तर आम्ही शांत बसणार नाही, असंही यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी प्रतिक्रिया दिली.