“मी पुण्यात नेतृत्व करतोय आणि यशस्वी नेतृत्व केलंय. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचा विषय असेल तर ज्या लोकप्रतिनिधींनी यशस्वी राजकारण केलंय त्यांचा सल्ला घ्यायचा असतो. परंतु जो विषय झाला त्यात तुम्ही बोलणार आहे का हे विचारलंच गेलं नाही. सगळ्यांना विषय दिले, मला एखादा विषय दिला असता तर मी भाषण केलं असतं. मेळावा उशिरा सुरू झाला, त्यात १०-१५ मिनिटं मला भाषण करायला दिली असती तर मी देखील मार्गदर्शन केलं असतं. परंतु असं काही झालं नाही,” असं मनसे नेते वसंत मोरे म्हणाले. मला पक्षात असं वेगळं का टाकतात हे समजत नाही. मी खाली आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी विचारलं तुम्ही का बोलले नाहीत, असंही ते म्हणाले.
“किती तक्रारी करायच्या आणि कोणाकोणाच्या करायच्या? माझं असं काही इंप्रेशन झालंय की मी फक्त तक्रारी करतो. आता मी फक्त सहन करायचं असं ठरवलं आहे. एक दिवस माझ्या विठ्ठलालाही माझ्या यातना कार्यकर्त्यांना माध्यमातून कळतील. त्या साहेबांपर्यंत पोहोचल्याही असतील. हे जे लोक करतायत त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे,” असं वसंत मोरे म्हणाले. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
“या सर्व गोष्टींमध्ये किती वेळा राज ठाकरेंकडे जाणार. आपणच का या गोष्टी बोलू शकत नाही का? केवळ ऑफिसमध्ये बसूनच बोलायचं का? मी सर्व ठिकाणी जातो, माझं पक्षावर, राज ठाकरेंवर प्रेम आहे. १५ वर्ष मी पक्षाच्या तिकिटावर निवडून येतोय. मनसेतून असा एकही लोकप्रतिनिधी झाला नाही. मनसेतून असं का डावललं जातंय, हा माझ्यावर रोष आहे का? पुणे शहरातला पक्षातला मी दहशतवादी आहे का असं वाटतंय. कार्यकर्ते एकमेकांना सांगतात तात्यांकडे जाऊ नको, तुझं तिकीट कट होईल. एक प्रकारची दहशत कार्यकर्त्यांच्या मनात का भरवली जाते हे समजत नाही,” असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.