लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘‘मी अयोध्येचा दौरा करणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले. त्यांनीच अयोध्येत रसद पुरविली आणि मनसे कार्यकर्ते तिथे गेल्यावर त्यांना कसे सापळ्यात अडकवायचे त्यासाठी मदत केली. त्या सापळ्यात आप1ण अडकू नये, म्हणून अयोध्या दौरा रद्द केला. भोंगा आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे, असे स्पष्टीकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी दिले. स्वारगेटच्या गणेश कला, क्रीडा मंच येथील सभेत राज ठाकरे बोलत होते.
ठाकरे म्हणाले, अयोध्या दौरा रद्द केला, त्यावर अनेकांनी टीका केली. मात्र, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशमधून माहिती मिळत होती की, सापळा रचला आहे. त्यामध्ये आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न होता. केवळ रामजन्मभूमीचे दर्शन नाही, तर कारसेवकांचा मृत्यू झाला, त्या ठिकाणालाही भेट द्यायची होती. मी तिथे गेलो असतो आणि काही झाले असते, तर मनसे कार्यकर्त्यांना तिथे कोणी सोडले नसते. त्यांच्यावर केसेस पडल्या असत्या. इकडे निवडणुकांत त्या बाहेर काढल्या गेल्या असत्या. हा सर्व अडकविण्यासाठी सापळा होता. माझ्यावर टीका झाली तरी चालेल, पण माझ्या पोरांवर परराज्यात गुन्हे दाखल होऊ देणार नाही.
तेव्हा कुठे होते हे हिंदुत्ववादी?
राज ठाकरे म्हणाले, रेल्वे भरतीच्या जागा महाराष्ट्रात, पण जाहिरात मात्र उत्तर प्रदेशातील वृत्तपत्रात होती. भरतीसाठी उत्तर प्रदेशातून मुले आली होती. त्यांना विचारण्यासाठी कार्यकर्ते गेले होते. त्यातून राडा झाला. नंतर राज्यामध्ये जिथे जागा, तेथील वृत्तपत्रात जाहिराती सुरू झाल्या. टोल आंदोलन हाती घेतले आणि ६४ ते ७० टोलनाके बंद पडले. पाकिस्तानी कलाकारांना देशातून हाकलून दिले. त्यावेळी कुठे होते हे हिंदुत्ववादी, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
भोंगा आंदोलन सुरूच
भोंगे आंदोलनसुरू केले आणि पहिल्यांदाच असे घडले. पहाटेची अजान बंद झाली. ९४ टक्के भोंग्यांचा आवाज कमी झाला. हे आंदोलन एक दिवसाचे नाही. दोन-चार दिवसांत एक पत्र देणार, ते घराघरांत द्यावे. भोंगा प्रकरणात २८ हजार मनसे सैनिकांना नोटिसा गेल्या. भोंगा आंदोलन इथून पुढे सुरूच राहणार असल्याचे राज यांनी सांगितले.