MNS Sharmila Thackeray Pune ( Marathi News ) : लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने इच्छुकांकडून पक्षाचं तिकीट आपल्यालाच मिळावं, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पुणे लोकसभेच्या जागेवर महायुती आणि महाविकास आघाडीसह मनसेकडूनही उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी यापूर्वीच पक्षाने संधी दिली तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलेलं आहे. मात्र पक्षाकडून पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नावाचाही या जागेसाठी विचार होऊ शकतो. अशातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी शहरातील एका कार्यक्रमादरम्यान केलेलं वक्तव्य चर्चेत आलं असून त्यांनी आपल्या वक्तव्यातून पुणे लोकसभेसाठी अप्रत्यक्षरित्या साईनाथ बाबर यांच्या उमेदवाराचे संकेत दिले आहेत की काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
साईनाथ बाबर यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका आरती बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी "कोंढव्याची सौभाग्यवती २०२४" या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, "आरती बाबर यांनी आपल्या भाषणात लोकांना आवाहन केलं की, आम्हा सर्वांना महापालिकेत पाठवा. मात्र तुमच्या घरातून फक्त तुलाच महापालिकेत बघायचं आहे. साईनाथ यांना मला महापालिकेत बघायचं नाही. कारण मला त्यांना आणखी वरच्या सभागृहात बघायचं आहे. या कार्यक्रमाला अगदी रस्त्यापासून प्रचंड गर्दी आहे. हे तुमच्यावर असणारं लोकांचं प्रेम आहे. हे प्रेमच तुम्हाला वरच्या सभागृहात नेऊन बसवणार आहे," असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"आपल्या लोकांनी एवढं काम करूनही मागच्या निवडणुकीत मतदारांनी आपल्याला निवडून दिलं नाही. मात्र मला आता खात्री आहे की, लोकं आता पुन्हा ती चूक करणार नाहीत. आरती, बाबू, वनिता या सगळ्या उमेदवारांना मला महापालिकेत बघायचंय, वरच्या सभागृहात बघायचंय, दिल्लीत पाठवलं तर दुधात साखर पडेल," असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
"साहेबांचं काय कौतुक सांगतो?"
शर्मिला ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांनाही मिश्किल टोला लगावला. "इथे आल्यानंतर साईनाथ मला कानात सांगत होते की, या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन मी साहेबांच्या हस्ते केलंय, त्या कामाचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते केलंय. पण साईनाथ, साहेबांपेक्षा तुमच्या कामांची जास्त उद्घाटने मी केली आहे. तुम्ही काय मला साहेबांचं कौतुक सांगता?" असं त्या म्हणाल्या.