पुणे :पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात उद्या मनसेचा मुंबईत मोर्चा निघणार आहे . त्याच मोर्चाची तयारी म्हणून ५००० हजार दुचाकी गाड्यांची 'राजगर्जना' रॅली शनिवारी पुण्यातून निघणार होती. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यावर ही रॅली रद्द करण्यात आली आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशमंदिरात महाआरती करून हा तिढा सोडवण्यात आला.
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन व मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन हा मूळ उद्देश या रॅलीच्या आयोजनामागे होता. ही रॅली ससून हॉस्पिटलपासून चालू होऊन, जिल्हाधिकारी कार्यालय, नरपतगिरी चौक, एमएसीबी चौक, नाना पेठ,चाचा हलवाई चौक, अल्पना टॉकीज, हमजेखान चौक, सोन्या मारुती चौक, समाधान चौक,दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून अलका टॉकीज,फर्ग्युसन कॉलेज रस्त्याने संचेती हॉस्पिटल शिवाजी महाराज पुतळाएसएसपीएमएस इथे समाप्त होणार होती. मात्र शुक्रवारी रात्री पुणे पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली. तरीही मनसैनिक रॅली काढण्यावर ठाम होते.त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अखेर सर्व परिस्थिती मनसे पदाधिकाऱ्यांनी ही रॅली महाआरतीत परावर्तित केली.
याबाबत शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले की, ' आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम होतो. मात्र पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वाहतुकीचे कारण देत मोर्चा न काढण्यासाठी विनंती केली. अखेर विचार विनिमय करून आम्ही मोर्चा रद्द केल्याचे त्यांनी जाहीर केले. इतकेच नव्हे. तर उद्याच्या मोर्च्यासाठी महाआरती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.