पुणे : मराठी भाषेचा पर्याय अॅमेझॉनवर असलाच पाहिजे अशी प्रमुख मागणी मनसेने केली होती. मुंबईत विविध ठिकाणी ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ अशा आशयाचे मजकूर असलेले फ्लेक्स झळकवले होते. तसेच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट कंपन्यांना सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय जर उपलब्ध झाला नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ कडक इशारा देखील मनसेकडून दिला गेला होता. मात्र याचवेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाची नोटीस आली. ;त्यानंतर मनसे आणि अॅमेझॉन वाद आणखी पेटला. त्याचे पडसाद पुण्यात उमटले असून कोंढवा भागात मनसे कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनचे ऑफिसची शुक्रवारी( दि. २५ ) तोडफोड केली.
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावे. अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते मात्र.राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर अॅमेझॉनला याची मोठी किंमत मोजावी लागेल असा गर्भित इशारा चित्रे यांनी दिला होता.
विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. त्यांनी तुमचा ईमेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले होते.
राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यामुळे मनसे आक्रमक
मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या पर्याय वापरण्यासंदर्भात सुरु करण्यात आलेल्या जोरदार मोहिमेला विरोध करण्यासाठी अॅमेझॉनने न्यायालयात गेले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाने नोटीस धाडली. यात राज ठाकरे यांच्यासह ठराविक मनसे सचिवांना ५ जानेवारीला न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र मनसेकडून या नोटिशीचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.