पुणे : शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे या प्रकाश जावडेकरांच्या वक्तव्यावर सर्वस्तरातून टीका हाेत असताना अाता मनविसेने या वक्तव्याचा फ्लेक्समधून समाचार घेतला अाहे. जावेडकर गुरुजींना भविष्यात शाळा-विद्यार्थी भीक मागायला लावणार असा घाणाघात या फ्लेक्समधून करण्यात अाला अाहे.
पुण्यातील ज्ञानप्रबाेधिनी शाळेमध्ये 14 सप्टेंबर राेजी अायाेजित कार्यक्रमात केंद्रीय मनुष्बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वरील वादग्रस्त विधान केले हाेते. आपल्या शाळेला किंवा महाविद्यालयाला मदत करणे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. सरकारकडे शाळांनी भीक मागू नये असे ते या कार्यक्रमात म्हणाले हाेते. त्यांच्या या वक्तव्यावर अाता मनविसेने शहरभर फ्लेक्स लावून त्यांच्यावर टीका केली अाहे. मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांच्या कल्पनेतून हे फ्लेक्स लावण्यात अाले अाहे. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, टिळक रस्ता याबराेबरच शहरातील विविध भागात 200 हून अधिक फ्लेक्स मनविसेकडून लावण्यात अाले अाहेत.
कल्पेश यादव म्हणाले, अस्तित्वात नसलेल्या जीअाे इन्स्टिट्यूटला नियम डावलून एक हजार काेटी देण्याचा घाट जावडेकरांनी या अाधीच घातला हाेता. मात्र मराठी शाळांना अनुदान देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकार हे शाळांना अनुदान देत असते भीक नव्हे. मराठी शाळा जगल्या पाहिजेत हे जावडेकरांना कळत नाही. विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार जावडेकरांना काेणी दिला असा सवालही यादव यांनी उपस्थित केला.
दरम्यान अाज जावडेकरांनी अापल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले असून अापल्या वक्तव्यातील ‘भिकेचा कटोरा’ हा शब्द चुकीचा असून, तो मी मागे घेत असल्याचे म्हंटले अाहे. तसेच माझ्या म्हणण्याचा आशय सरकार शिक्षणावर अधिकाधिक खर्च करेल जसे गेल्या चार वर्षांत मोदी सरकारने ७० टक्के शिक्षणावरील तरतूद वाढविली आहे. त्यामुळे अशी आम्ही वाढवतच राहू. परंतु त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांनी सुध्दा आपल्या शाळा, कॉलेज या संस्थांच्या विकासामध्ये योगदान केले पाहिजे. हा माझ्या म्हणण्याचा मूळ आशय अाहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.